सागर गुजर ल्ल सातारा सातारा शहरात सत्ताधारी दोन्ही आघाड्यांच्या प्रस्थापितांना बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केले आहे. सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडी यांचे मनोमिलन कायम राहिले असते, तर यापेक्षा मोठी पडझड दोन्ही आघाड्यांना सोसावी लागली असती; परंतु मनोमिलन नसतानाही अनेक जण भाजप, मनसे यांच्या वळचणीला जाऊन बसले. शहरातील बहुतांश प्रभागांत या बंडखोरांचे आव्हान कायम राहिले असल्याने हीच खरी डोकेदुखी पालिकेच्या सत्तेतील प्रस्थापितांना होऊन बसली आहे. दोघांत भांडणे तिसऱ्याचा लाभ, अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. प्रभाग १ व २ मध्ये दोन्ही आघाड्यांच्या प्रस्थापितांविरोधात भाजप, शिवसेना, मनसे या पक्षाच्या उमेदवारांनी बळ एकवटले आहे. प्रभाग ४ मध्ये माजी नगराध्यक्ष निशांत पाटील यांना माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. पाटील व माळवदे यांचे सख्य जुने असले तरी या निवडणुकीत काय बिनसले? याचा ऊहापोह सदरबझार परिसरात केला जात आहे. नगरविकास आघाडीने येथे विकास धुमाळ यांना संधी देऊन सोज्वळ चेहरा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये साविआचे पक्षप्रतोद अॅड. दत्ता बनकर यांच्याविरोधात नविआने अण्णासाहेब मोरे यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी नविआचे माजी नगरसेवक रणजित साळुंखे यांनी बंडखोरी केली आहे. प्रभाग ७ मध्ये साविआने नगराध्यक्ष विजय बडेकर यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांच्याविरोधात नविआने विनोद खंदारे यांना उमेदवारी दिली आहे. नविआचे माजी नगरसेवक प्रकाश बडेकर यांनी सलग दुसऱ्या वेळी बंडखोरी केली आहे. भाजपचे अशोक धडचिरे, भारिपचे योगराज त्रिंबके यांच्यासह आणखी काही उमेदवारांनी येथे आव्हान दिले आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये साविआच्या वसंत जोशी व नविआचे शकील बागवान यांच्याविरोधात नविआच्या गोटातील धीरज घाडगे यांनी आव्हान दिले आहे. विरोधी पक्षनेते अॅड. बाळासाहेब बाबर यांनीही पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दंड थोपटले आहेत. प्रभाग ९ मध्ये नविआचे बाळासाहेब भुजबळ व साविआचे ज्ञानेश्वर पवार यांच्याविरोधात नविआचे बंडखोर व माजी नगराध्यक्षा सुजाता भोसले यांचे पती किरण भोसले यांनी दंड थोपटले आहेत. प्रभाग ११ मधून साविआच्या सुमती खुटाळे व नविआच्या अरुणा पोतदार यांच्या समोरही साविआच्या अश्विनी पुजारी व चित्रा कडून यांनी आव्हान उभे केले आहे. प्रभाग १३ मधून शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष किशोर पंडित यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवली. त्यांच्यापुढे नविआचे जनार्दन जगदाळे, साविआचे यशोधन नारकर यांचे कडवे आव्हान आहे, त्याचबरोबर नाना इंदलकर, सचिन सुपेकर आदी ‘व्होट बँक’ असणाऱ्या उमेदवारांचाही त्यांना सामना करावा लागणार आहे. माजी उपनगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक यांच्याविरोधात त्यांच्याच आघाडीच्या माजी नगरसेविका विमल पाटील यांनी बंडखोरी केली. पाटील भाजपच्या चिन्हावर येथून लढत आहेत. नविआने सारिका जाधव या नवख्या उमेदवाराला येथून उमेदवारी दिली आहे. प्रभाग १४ मध्ये वर्षानुवर्षे आपली मांड कायम राखून असणारे माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांच्याविरोधात साविआने प्रवीण अहिरे या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. अहिरेंनी मोनेंच्या ३१ वर्षांच्या कालावधीतील सातबाराच येथे बाहेर काढला आहे. प्रभाग १५ मध्ये माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासमोर प्रशांत आहेरराव व सागर पावसे या दोघांचे कडवे आव्हान असणार आहे. मागील सलग दोन निवडणुकांत मोहिते यांनी विक्रमी मते मिळवून एकहाती विजय मिळविला होता, आता याची पुनरावृत्ती होणार का? याचीच प्रभागातील नागरिकांना उत्सुकता आहे. प्रभाग १६ मध्ये माजी नगरसेवक कल्याण राक्षे यांना उदयनराजेंनी माघार घ्यायला सांगितले. याठिकाणी रवींद्र पवार, प्रवीण पाटील, धनंजय जांभळे यांच्यातील सामना रंगणार आहे. या प्रभागात शिवसेना, काँगे्रस, भाजप यांची निशाणे पहिल्यांदाच फुलली आहेत. भाजपच्या हेमांगी जोशी यांना साविआने उमेदवारी दिली. भाजपतर्फे सिध्दी पवार यांना या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आहे. साविआचे माजी नगरसेवक रमेश जाधव यांना साविआने आपल्या गोेटात सामील करुन प्रभाग १७ मध्ये उमेदवारी दिली असून त्यांचा राजू गोडसे, विजयकुमार काटवटे यांच्याशी सामना होणार आहे. या सर्वच प्रभागांमध्ये खऱ्या अर्थाने प्रस्थापितांची कसोटी लागणार आहे. सर्वांच्यावतीने जोरदार भेटीगाठींची भिरकिट सुरु ठेवली आहे. लढत नेत्यांची.. उमेदवारही कट्टर ! नगरविकास आघाडीशी अनेक वर्षांचा असणारा घरोबा सोडून माजी नगरसेवक वसंत लेवे उदयनराजेंच्यासोबत सातारा विकास आघाडीत गेले आहेत. त्यांनी नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. कदम जिथे उभे राहिले असते, तिथे त्यांच्याविरोधात आपण उमेदवारी दाखल केली असती, अशी जहाल भूमिका वसंत लेवे यांनी घेतली होती. माझ्याविरोधातील उमेदवारांचा प्रभागातील सात-बारा शोधून दाखवा, असा प्रचार वसंत लेवे यांच्यावतीने केला गेला. तर मंगळवार तळे परिसराशी अनेक वर्षांपासून असणारी जवळीक हाच अविनाश कदम यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे.
बंडखोरांचं दुखणं प्रस्थापितांच्या जिव्हारी!
By admin | Published: November 17, 2016 10:58 PM