सातारा : राज्य शासनाने महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांचाही समावेश आहे. देशमुख यांची सांगलीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे.सांगलीच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांची साताऱ्याच्या प्रांताधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. सोलापूर येथील उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांची फलटणचे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका ठाकूर यांची साताऱ्यात उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. पुणे येथील भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी समिक्षा चंद्राकार यांची साताऱ्यात पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून तर सांगली येथील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी-मुसळे यांची साताऱ्यात रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.कऱ्हाड येथील प्रांताधिकारी हिंमत खराडे यांची पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षकपदी नेमणूक झाली. त्यांच्या जागी पुणे येथील सतीश राऊत हे आले आहेत. सतीश राऊत हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील अध्यक्षांचे सचिव या पदी सध्या कार्यरत आहेत.
राज्य शासनाच्या महसूल विभागाच्यावतीने बदल्यांचे शासन आदेश नुकतेच काढण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी हिंमत खराडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणुकीशी संबंधित पदावर करण्यात आलेल्या आहेत. त्यांनी तत्काळ आपल्या नेमणुकीच्या जागी पदभार स्वीकारावा, असे पत्रात नमूद केले आहे.