महाबळेश्वर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आपला तीन दिवसांचा विश्रांती दौरा आटोपून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह रविवारी दुपारी मुंबईला हेलिकॉप्टरने रवाना झाले. तत्पूर्वी सकाळी त्यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. यावेळी सातारा जिल्हा संपर्क नेते नितीन बानुगडे-पाटील, डी. एम. बावळेकर यांच्याशी एकांतात चर्चा करत जिल्ह्याचा आढावाही घेतला.राज्याची सत्ता स्थापन करताना भाजपाने शिवसेनेशी गद्दारी केली, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्याचे प्रत्यंतर यावेळी आले. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांनी ‘आवाज कुणाचा शिवसेनेचा, शिवसेना झिंदाबाद’ अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या. यावेळी शिवसैनिकांनी आपण राज्याच्या हिताचा जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य आहे. आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही देऊन गद्दारांना चांगला धडा शिकवा, अशी मागणी केली. दरम्यान, महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचे कौतुक केले. यावेळी सातारा-सांगली जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनीही ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांनीही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामध्ये जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, संजय मोहिते, हनुमंत चावरे, नरेंद्र पाटील, महाबळेश्वर तालुका प्रमुख यशवंत घाडगे, अशोक शिंदे, लीला जाधव, एकनाथ ओंबळे, महाबळेश्वर शहर प्रमुख विजय नायडू, नगरसेवक संतोष शिंदे, लक्ष्मण कोंढाळकर, पूनम कांबळे, पाचगणी शहरप्रमुख संजय कासुर्डे, वाई शहर प्रमुख किरण खामकर, माजी जिल्हा प्रमुख गोपाळ वागदरे, लीलाताई शिंदे, रियाज डांगे, बाळकृष्ण साळुंखे, अनंत भिसे, महेश शिंदे, नाना कदम, प्रवीण शिंदे, धनंजय भिसे, राजेंद्र पल्लोड, शंकर ढेबे, चंद्रकांत बावळेकर उपस्थित होते. ठाकरेंच्या अनौपचारिक दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. (प्रतिनिधी)
सातारा जिल्ह्याच्या कामकाजाचा उद्धव ठाकरेंकडून आढावा
By admin | Published: November 17, 2014 9:07 PM