कऱ्हाड : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये लहान मुलांसाठी जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी करुन आढावा घेतला.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने महसूल प्रशासनाने कोरोनाच्या पहिल्या लाटेतही याठिकाणी पन्नास बेड तर सध्याच्या दुसऱ्या लाटेतही पन्नास बेड या सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, आता तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याच्या अनुषंगाने याचठिकाणी एकूण ८५ बेडची पुन्हा व्यवस्था करण्यात येत आहे. यातील तीसहून अधिक बेड हे व्हेंटिलेटरची सुविधा असलेले राहणार आहेत. त्यासाठी याठिकाणी सध्या काम सुरू आहे.
अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी या कामाची पाहणी करत काही सूचना केल्या. व्हेंटिलेटर बेडसाठी जादा जागेची आवश्यकता असल्याने या सेंटरमधील दोन विभागांमध्ये हे बेड बसविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने शिंदे यांनी संबंधितांना सूचना केल्या. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, मंडल अधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम, आदी उपस्थित होते.
फोटो : २४ केआरडी ०१
कॅप्शन : कऱ्हाडच्या जम्बो कोविड सेंटरची अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पाहणी केली.