सातारा : जिल्ह्यांतर्गत शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संवर्ग एकमधील शिक्षकांना बदलीत सूट देण्यात आली आहे. या संवर्गात समावेश होण्यासाठी अनेक शिक्षकांनी आपले अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले केले आहेत. यावर काही शिक्षक संघटनांनी ही बोगस प्रमाणपत्रे असल्याचा आक्षेप घेतल्यामुळे, संवर्ग एकमधील शिक्षकांनी सादर केलेल्या अपंग प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शिक्षण विभागाला बजावले आहेत. त्यामुळे या संवर्गातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी होणार आहे.
संवर्ग एकमध्ये अपंग शिक्षक, अपंग मुलांचे पालक अशा शिक्षकांचा समावेश होतो. शासन आदेशात या संवर्गातील शिक्षकांना बदलीत सवलत, तर त्यांच्या सोयीनुसार बदल्या करण्यात याव्यात, त्याचबरोबर बदली प्रक्रियेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना आहेत.त्यामुळे अनेक शिक्षकांनी यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र दिली आहेत. तर अनेक शिक्षकांनी आपला पाल्य अपंग असल्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला सादर करून संवर्ग एकचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांवर काही शिक्षक संघटनांनी बोगस प्रमाणपत्र असल्याची आक्षेप घेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रारी केल्या होत्या.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत. शिक्षण विभागाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अशा अपंग शिक्षक, अपंग मुलांचे पालक व मुले फेरतपासणीसाठी पाठवत असून, त्या प्रमाणपत्रांची तपासणी करून मिळावी, असे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक यांना पाठवले आहे. त्यानुसार मंगळवारी-कर्णबधिर, बुधवारी-अस्थिव्यंग-पक्षघात, गुरुवारी दृष्टिदोष याप्रमाणे प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली. यामुळे शिक्षकांची धाबे दणाणली असून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात ते मग्न आहेत.