कऱ्हाड : विक्रीच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हर जवळ बाळगणाऱ्यास कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेऊन अटक केली़ विंग( ता़ कऱ्हाड) येथील हॉटेल सागरमध्ये आज, रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई करण्यात आली़ प्रकाश कृष्णाजी जाधव (वय ३६, रा़ आटके, ता़ कऱ्हाड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पोलीस निरीक्षक नितीन जगताप यांच्यासह कॉन्स्टेबल सज्जन जगताप व हवालदार देशमुख पोलीस जीपने विंग परिसरात गस्तीसाठी गेले त्यावेळी विंगमधील हॉटेल सागरमध्ये एकजण रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती निरीक्षक जगताप यांना मिळाली़ / त्यानुसार पोलीस पथक विंगमध्ये पोहोचले़ पथकातील कॉन्स्टेबल सज्जन जगताप हे संशयिताला ओळखत असल्याने ते हॉटेलपासून काही अंतरावर थांबले़ संशयित प्रकाश जाधव हा हॉटेलमध्ये जाताच कॉन्स्टेबल जगताप यांनी पथकाला इशारा केला़ त्यानंतर निरीक्षक जगताप यांच्यासह कॉन्स्टेबल जगताप व देशमुख तातडीने हॉटेलमध्ये गेले़ त्यांनी प्रकाश जाधवला ताब्यात घेतले़ हॉटेलमध्येच त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आढळून आले़ तसेच खिशात पाचशे रुपये किमतीची पाच जिवंत काडतुसे आढळून आली़ रिव्हॉल्व्हर व काडतुसे जप्त करून पोलिसांनी प्रकाश जाधवला अटक केली़ प्रकाश जाधव हा संबंधित रिव्हॉल्व्हरची विक्री करणार होता़ मात्र, तो व्यवहार कोणाशी व किती रुपयांत होणार होता, याबाबत अद्याप पोलिसांना माहिती मिळालेली नाही़ यापूर्वीही त्याने अशा पद्धतीने रिव्हॉल्व्हरची तस्करी केली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे़ याबाबत कॉन्स्टेबल सज्जन जगताप यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
रिव्हॉल्व्हरची तस्करी करणाऱ्यास अटक
By admin | Published: October 05, 2014 10:34 PM