रिक्षांमुळे कोंडी (फोटो : ०३इन्फो०२)
कऱ्हाड : शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौक तसेच बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याकडेला काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बसस्थानकासमोरील रस्त्यावरच उभ्या केल्यामुळे या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत.
थंडी गायब
कऱ्हाड : शहरासह तालुक्यात गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तालुक्यात थंडीचा कडाका वाढला होता तसेच धुक्याचे प्रमाणही जास्त होते. मात्र, चार दिवसांपासून हे प्रमाण कमी झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे.
जीव धोक्यात
कुसूर : शिंंदेवाडी (ता. कऱ्हाड) या ठिकाणी धोकादायक वळण असल्याने रात्रीच्यावेळी वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने त्यांचे अपघात होत आहेत. या वळणावर अपघात होऊ नये म्हणून संबंधित विभागाने दिशादर्शक व सूचना फलक लावावेत, अशी मागणी सध्या वाहनचालकांतून केली जात आहे.
श्वानांचा उपद्रव (फोटो : ०३इन्फो०१)
तांबवे : परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसात अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.