सातारा : क्षेत्र माहुली, ता. सातारा येथील अभिजित मोहिरे (वय ३२) या रिक्षाचालकाचा खून त्याच्या मित्रानेच केला असल्याचे तपासात समोर आले असून, घरातील टीव्ही चोरल्यामुळेच अभिजितचा खून केल्याची कबुली मित्राने पोलिसांकडे दिली आहे.
अमोल तानाजी चव्हाण (वय ३५, रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) असे अटक केलेल्या मित्राचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, क्षेत्र माहुली येथील अभिजित मोहिरे हा रिक्षा व्यावसायिक होता. गुरुवारी रात्री नऊ वाजता तो घरी गेला. त्यावेळी अज्ञाताने डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर अभिजितचा मित्र अमोल चव्हाण हा तेथे आल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कसलेही आडेवेडे न घेता अभिजितच्या खुनाची कबुली दिली.
अभिजित आणि अमोल हे लहानपणापासून मित्र होते. महिनाभरापूर्वी अभिजितने अमोलचा टिव्ही चोरला होता. त्यावेळी अमोलने त्याच्याकडे पैसे मागितले. हे पैसे देण्यास अभिजितने सहमती दर्शवली होती. या पैशावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. एके दिवशी अभिजितने अमोलच्या तोंडावर फाईट मारून त्याचे दात पाडले होते. याचा राग अमोलच्या मनात खदखदत होता. गुरूवारी अभिजित रिक्षा घेऊन घरी आल्यानंतर अमोल त्याच्या घरात गेला. यावेळी पुन्हा या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर अमोलने संतापाच्या भरात अभिजितच्या डोक्यात फरशी घातली. अभिजित रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचे पाहून अमोलने तेथून पळ काढला होता.
सहायक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांनी अमोल चव्हाण याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी न्यायालयाने अमोलला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील युवक जागीच ठारसातारा : दुचाकीवरून घरी येत असताना डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील सचिन चंद्रकांत गुजर (वय ३५, रा. भोंदवडे, ता. सातारा) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास राजापुरी फाट्यावर झाला.याबाबत अधिक माहिती अशी, सचिन गुजर हा वनविभागामध्ये काम करत होता. ठोसेघर, ता. सातारा येथे त्याची ड्यूटी होती. सायंकाळी ड्यूटी संपवून तो मित्रासमवेत दुचाकीवरून घरी येत होता. राजापुरी फाट्यावर आल्यानंतर समोरून आलेल्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत सचिन गुजर हा जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी जखमी मित्राला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद झाली नव्हती.