सातारा : शाहुपरी येथील रिंकू ओसवाल विवाहिता खून प्रकरणात पोलिसांनी सोमवारी रिंकूची आई चंदा, बहीण प्रतिका यांच्याकडे चौकशी करत पोलीस उपनिरीक्षक संतोष पांढरे यांनी त्यांचे जबाब घेतले. रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा खून गळा दाबूनच झाल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी पती भरत कांतिलाल ओसवाल यास अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आणखी सक्षमपणे करावा, या मागणीसाठी रिंकूच्या नातेवाइकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि पोलीस मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.पोलीस मुख्यालयासमोर ठिय्या : पुरावे गोळा करण्यासाठी केली पुन्हा पोलीस कोठडीची मागणी सातारा : शाहूपुरी येथील विवाहिता रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा खून गळा दाबूनच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी या खून प्रकरणाचा तपास सक्षमपणे करण्यासाठी आरोपी भरत कांतिलाल ओसवाल याचे फोन कॉल्स, व्हॉट्स अॅप आदी माहिती, तसेच पुरावे गोळा करण्यासाठी सरकार पक्षाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाने सोमवारी एका मोर्चाद्वारे केली. शाहूपुरी येथील रिंकू भरत ओसवाल (वय २४) हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. रिंकूची आई चंदा यांनीही मृत्यूबाबत शंका उपस्थित केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. चंदा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती भरत ओसवाल रिंकूला मानसिक त्रास देण्याबरोबरच जाचहाटही करत होता. मूल होत नसल्यामुळे तो चिडून होता. विवाहप्रसंगी तोंडी बोलणे झाल्याप्रमाणे २२ पैकी सोळा तोळे सोने देण्यात आले होते. यानंतर उर्वरित सोन्यासाठी रिंकूला मानसिक त्रास दिला जात होता. दरम्यान, वैद्यकीय अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार, रिंकूचा खून गळा दाबून झाल्याचे नमूद करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पती भरत यास अटक केली आणि त्याला पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाग्यश्रीच्या खून प्रकरणात आरोपी भरत ओसवाल यास अटक झाली असली तरी त्याचा आवश्यक तो तपास अजून झालेला नाही. तपास चारही बाजूंनी व्हायला हवा. भरत ओसवाल याचे फोन कॉल्स, व्हॉट्स अॅप याची सर्व माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी सरकार पक्षाने पुन्हा एकदा आरोपीची पोलीस कोठडी मागायला हवी आणि त्या दृष्टीने तपास करायला हवा. याप्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव येता कामा नये. सरकारी वकिलांनी आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू देता कामा नये. या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या उणिवा राहू नयेत म्हणून पोलिसांना मार्गदर्शन करण्याची मागणीही ‘मलोआ’ने निवेदनात केली आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याबरोबरच खटल्याचे काम लवकर चालावे आणि आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी सरकारी वकील आणि पोलिसांनी संवेदनशीलपणे कामकाज करावे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना भेटून या प्रकरणाची सखोलपणे तपासणी करण्याची मागणी केली. डॉ. देशमुख यांनीही त्यांना सक्षमपणे तपासणी करण्याची ग्वाही दिली. (प्रतिनिधी)कुटुंबाबरोबर संबंध ठेवू नका..!भरत ओसवाल याने गुलमोहर कॉलनीत पत्नी रिंकूचा ज्या प्रकारे खून केला ती घटना निंदनीय आहे. या घटनेचा निषेध म्हणून समाजातील सर्व घटकांतील लोकांनी आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी या कुटुंबाबरोबर कोणताही कौटुंबिक अथवा मैत्रिपूर्ण संबंध ठेवू नये. त्याचबरोबर त्यांना आर्थिक पाठबळ देऊ नका. या प्रकरणात केवळ शाब्दिक निषेध व्यक्त करणे पुरेसे नाही, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करून कुटुंबांचा निषेध करावा, अशी मागणीही ‘मलोआ’ने निवेदनात केली आहे. प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन या प्रकरणाचा तपास आणखी वेगाने होण्यासाठी सातारा येथे सोमवारी महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या वतीने राज्याध्यक्ष वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला मुक्तांगणपासून सुरुवात झाली. येथे भरत ओसवाल याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.‘सातारकर’ म्हणून आम्ही माफी मागतो !रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा खून ही सातारकरांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. सातारा शहरात आम्ही तिला सुरक्षितपणे नांदवू शकलो नाही, याची सातारकर म्हणून आम्हाला खंत वाटते. या कुटुंबांची सातारकर म्हणून आम्ही माफी मागतो, असे स्पष्ट करतच मृत्युपश्चात भाग्यश्रीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आमची असल्याचेही महिला लोक आयोगाने यावेळी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
रिंकू खूनप्रकरणी सातारकर रस्त्यावर...नातेवाइकांची चौकशी
By admin | Published: October 27, 2014 9:48 PM