कऱ्हाड पालिकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा शिंदे बोलत होत्या. अर्थसंकल्प मंजूर करण्यावरून सभागृहात झालेल्या गदारोळाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावस्कर, फारुख पटवेकर, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विनायक पावसकर म्हणाले, परवाच्या अर्थसंकल्पाच्या सभेत जनशक्ती आघाडीने सूचना कोणी वाचायची यावरून बराच गदारोळ केला. वास्तविक ज्याने एखादी सूचना या अर्थसंकल्पात मांडली असेल असा कोणताही सदस्य सूचना वाचू शकतो, तर इतर सूचना कोणी वाचायच्या हे नगराध्यक्ष ठरवू शकतात; असा कायदा सांगतो. पण आमचे बहुमत आहे, सूचना वाचण्याचा फक्त अधिकार आम्हालाच आहे, असा गोड गैरसमज जनशक्ती आघाडीने करून घेतला आहे. त्यावरच त्यांनी वाद केला .
वास्तविक अर्थसंकल्प तयार करताना प्रत्येक खात्याला ते कळविले जाते. त्याची माहिती आल्यावर स्टॅंडिंग समितीत त्यावर चर्चा होते. मग ते विशेष सभेत मांडले जाते. आता स्टँडिंग कमिटीमध्ये बहुमत कोणाचे तर ''जनशक्ती''चे; भाजपच्या तर फक्त एकट्या नगराध्यक्षा तिथे आहेत. लोकशाही आघाडीचा सदस्यही तेथे आहे. मग स्टॅंडिंगच्या तीन बैठकीत याबाबत चर्चा झाली असताना विशेष सभेत सूचना फेटाळणे, उपसूचना मांडणे हा फार्स कशासाठी? स्टॅंडिंगच्या बैठकीत तुम्ही काय करत होता? असा सवाल करीत पावसकर म्हणाले, राजेंद्र यादव व त्यांच्या सहकाऱ्यांचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रसिद्धी मिळविण्यासाठी चाललेला हा स्टंट आहे.
जनशक्तीच्या नेत्यांनी उपसूचना कशाला म्हणायचे हे अगोदर समजून घ्यावे आणि जर तुमच्या उपसूचना सभागृहात मांडता अन् त्याचे लेखी पत्र अजूनही तुम्ही देत नाही याचा अर्थ काय समजायचा? ज्या गोष्टी पालिकेच्या कक्षेत येत नाहीत, त्याचा समावेश अर्थसंकल्पात कसा करायचा? काही उपसूचना मांडताना पालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार कोण करणार? असा सवालही पावसकर यांनी केला. हा अर्थसंकल्प बरोबर असल्याने त्यांना फक्त स्टेडियमच्या भाडेवाढीवरच बोलता आले, असेही ते म्हणाले.
चौकट
सभापती कोण, ठेकेदार कोण?
---------
अर्थसंकल्पीय सभेत गत वर्षभरात होर्डिंग्स चे उत्पन्न आले नाही असा उल्लेख सौरभ पाटील यांनी केला होता. तोच धागा पकडत विनायक पावस्कर म्हणाले, होर्डिंग्सचे भाडे बांधकाम विभागाकडे येते. त्याचे सध्या सभापती कोण आहेत? त्याचे ठेकेदार कोण आहेत? याची माहिती पाटील यांनी घ्यावी. म्हणजे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांना आपोआप मिळेल.
चौकट
मग सभापतिपदाच्या जागा का अडविता ?
-----
अर्थसंकल्पावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही बांधील नाही, असे राजेंद्र यादव सांगतात. याकडे लक्ष वेधले असता पावस्कर म्हणाले, अर्थसंकल्प तयार करायला सगळे सभापती असतात .त्यांनीच तर उत्तरे दिली पाहिजेत. नाहीतर सभापतिपदाच्या जागा का आडविता, असा सवालही त्यांनी केला.