पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे रविवारी रात्री दंगल उसळली. संतप्त जमावाने जाळपोळ करीत मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. तसेच प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर सुमारे पंधराजण गंभीर जखमी झाले. या घटनेने जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे.दरम्यान, घटनेनंतर पुसेसावळीसह परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाकडून इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले. सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आलेला मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.रविवारी रात्री जुनी बाजारपेठमार्गे ग्रामपंचायतीपासून प्रार्थनास्थळाकडे गेला. त्याठिकाणी काही घरांमध्ये घुसून तोडफोड करण्यात आली. तसेच दगड घालून वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. प्रार्थनास्थळाकडे गेलेल्या जमावाने तेथील दहा ते पंधरा जणांना बेदम मारहाण केली. तसेच जाळपोळही केली. ग्रामपंचायतीपासून काही अंतरावर दोन दुचाकी तसेच इतर साहित्य जाळण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा त्याठिकाणी पोहोचला. पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जमावाने पोलिसांवरही तुफान दगडफेक केली. त्यामध्ये पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना जिल्ह्यातून अधिक पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा जमाव तेथून पांगला.घटनास्थळावरील परिस्थिती गंभीर असल्यामुळे अग्निशामक दलासह रुग्णवाहिकांना त्याठिकाणी पाचारण करण्यात आले. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिका तसेच मिळेल त्या वाहनातून कराडच्या कृष्णा रुग्णालयात तसेच सातारच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना हसन शिकलगार (वय २८) या युवकाचा मृत्यू झाला. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी २५ ते ३० जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर संशयीतांची धरपकड सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास केला जात
Satara: पुसेसावळीत आक्षेपार्ह पोस्टमुळे दंगल, एकाचा मृत्यू, १५ गंभीर; संतप्त जमावाकडून जाळपोळ, पोलिसांवरही दगडफेक
By संजय पाटील | Published: September 11, 2023 5:49 PM