- रवींद्र माने
ढेबेवाडी - ‘अडीच वर्षांपासून शिवसेना पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून चालू होते, ही बाब आम्हाला पटली नाही म्हणूनच आम्ही उठाव करून शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, या बाबीला आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’ असा सल्ला पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. भोसगाव (ता. पाटण) येथे विभागातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे संचालक सर्जेराव जाधव, शिवाजीराव शेवाळे, विकासगिरी गोसावी, रणजित पाटील, ज्योतीराज काळे, तुषार देशमुख, मनोज मोहिते, शिवाजीराव जगदाळे, अंकुश महाडिक, नानासाहेब साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री देसाई म्हणाले, ‘अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये असताना आम्हाला आमचा पारंपरिक शत्रू काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागत होते. त्यावेळी खूपच त्रास होत होता, आमचे मुख्यमंत्री असतानाही आमचाच पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने चालू होते. विकासकामांसाठी निधी देताना आमदारांबरोबर त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवारालाही तेवढाच निधी दिला जायचा, हा जाच आम्हाला सहन झाला नाही. याबाबत पक्ष प्रमुखांच्याकडे अनेक वेळेला तक्रारी करूनही त्यावर निर्णय झाला नाही. म्हणूनच ५५ आमदारांपैकी ४० आमदार, १२ खासदार यांनी मिळून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला. युवा नेते मनोज मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पोपटराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
विरोधकांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये...विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमच्या या निर्णयाला आता बेईमानी म्हटले आहे, मग २०१९ मध्ये अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी केलेला शपथविधी याला काय म्हणायचे?, असा प्रश्न करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. विरोधक करत असलेल्या टीका आणि बदनामी थांबवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवावे, आम्ही गावागावांत आणि वाडी-वस्तीत विकास निधी पोहोचवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी यावेळी दिले.