कुडाळ : कोरोनाच्या परिस्थितीत रोजगार गेला, व्यवसाय ठप्प झाले. अशातच वाढत्या महागाईने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या. या परिस्थितीत कसं जगायचं, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर महागाई आटोक्यात येईल, असे वाटत होते; मात्र असे घडलेच नाही. यामुळे महागाईच्या या झळांनी सर्वसामान्यांचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे.
कोरोनामुळे लोकांच्या तोंडचा घास कडू झाला आहे. आता घरातील जेवणालाही महागाईची चरचरीत फोडणी बसली. जानेवारीपासून खाद्यतेल, डाळीच्या किमतीचा सारखा वाढता आलेख दिसत होता. जानेवारीत २१०० रुपयांना मिळणारे सूर्यफूल तेल आता २६५० रुपयांच्या घरात पोहोचले. सोयाबीन, शेंगदाणा तेलाचीही अशीच दरवाढ झालेली आहे. याच्या किमती ५० ते १०० रुपयांनी कमी झाल्या असल्या तरी सध्याचा असणारा दर जास्तीचाच आहे. कडधान्य आणि डाळींच्या दराबाबतही अशीच परिस्थिती आहे. यामुळे गरीबाघरी अन्नाचा घासही कडू वाटू लागला आहे.
पेट्रोलची शतकी भरारी, डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. याचा फटका वाहतूक खर्चात वाढ होऊन वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत. मुळातच लॉकडाऊनमुळे लोकांना घरी बसवून ठवले आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. स्वतः जवळ असणारा साठवणीतील पैसाही आता खर्चून गेला आहे. सामान्यांचे खिसे रिकामे झाल्याने या वाढत्या महागाईने त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. आता निर्बंध शिथिल होत जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहत असताना महागाई कमी व्हावी, अशी नागरिकांची भावना आहे.
चौकट :
कोरोना काळातच महागाईचा चढता आलेख काही महिन्यांत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झालेली आहे. संचारबंदीचे कारण पुढे करत ग्राहकांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. यामध्ये खाद्यतेल, डाळी यांच्या दरात अधिकची वाढ झालेली आहे. अशातच स्वयंपाकाचा गॅसही आता ८०० ते ८३० रुपयांना घ्यावा लागत आहे. उज्ज्वला गॅससाठीचे मिळणारे अनुदानही बंद झाले आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने तर उच्चांक गाठला आहे. यामुळे कोरोना काळात जगण्यासाठीचा संघर्ष आहे.