सातारा : अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर भाजीपाल्याचे दर वाढत चालले आहेत. टोमॅटो तेजीत असून, गवार आणि शेवगा शेंगही भाव खात आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून वाटाण्याचा दर १०० रुपयांच्याही पुढे आहे. त्यामुळे सफरचंदापेक्षाही वाटाणा महाग दराने घेण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून भाज्यांचे दर तेजीत आहेत. महिन्याभरापूर्वी तर वांगी १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली होती. तर टोमॅटोचा भाव ८० रुपयांवर गेलेला. मात्र, त्यानंतर वांगी आणि टोमॅटोचे दर थोडे कमी झाले. तरीही सध्या वांगी आणि टोमॅटोचा दर किमान ६० रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर वाटाण्याचा दर पाच महिन्यांपासून वाढलेला आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला १६ हजारांपर्यंत दर मिळाल्याचे दिसून आले. त्यामुळे मंडईत किलोचा दर सतत १०० रुपयांच्या पुढे राहिला. सध्याही साताऱ्यातील मंडईत कोबीचा अपवाद वगळता कोणतीही भाजी ३० ते ४० रुपयांच्या खाली नाही. फ्लॉवर, भेंडी, पावटा, गवार यांचेही दर वाढलेलेच आहेत.
भाजीपाला दर (प्रतिकिलो)
वांगी ६०
कोबी ३० ते ४०
टोमॅटो ६०-८०
फ्लॉवर ४०-६०
शेवगा शेंग ८०-१००
गवार ६०-८०
वाटाणा १००-१२०
दोडका ६०-८०
काळा घेवडा ८०
कारली ४०
आजचा भाव
सफरचंद १००
टोमॅटो ८०
नुकसानामुळे वाढले दर...
- जिल्ह्यात यावर्षी पावसाळ्यात अनेकवेळा अतिवृष्टी झाली होती. यामध्ये भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली. आताही तशीच स्थिती टिकून आहे.
- जिल्ह्यात मागील १० दिवसांत अवकाळी पाऊस होता. यामुळे शेतमालाचे नुकसान झाले. तसेच चिखलामुळे भाजीपाला बाहेर काढता आला नाही. परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत.
वाटाणा अन् टोमॅटो परवडेना...
मागील चार महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढत गेले आहेत. यामध्ये वाटाण्याचा दर तर सतत १०० रुपयांच्या पुढे आहे. तर टोमॅटोही ८० रुपये किलोने मिळतो. यामुळे वाटाणा आणि टोमॅटोचा वापर भाज्यांत कमीच करण्याची वेळ आली आहे. - पुष्पा पाटील, गृहिणी
पालेभाज्या महाग झाल्या आहेत. तसेच फळभाज्यांचीही हीच स्थिती आहे. शेवगा शेंग १०० रुपये किलोपर्यंत आहे. तसेच इतर कोणत्याही भाज्या घेण्यास गेले तर ६० रुपयांच्या आत नाहीत. टोमॅटोचे भाव एकदमच कडाडले आहेत. - शामराव काळे, ग्राहक
आणखी काही दिवस दर वाढलेलेच राहणार...
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. याला कारण म्हणजे पावसामुळे भाज्यांचे झालेले नुकसान. काही दिवसांपूर्वीच अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका बसला. त्यामुळे आता आणखी दर वाढले आहेत. - शरद मोरे, विक्रेता
आम्हालाही भाज्या महागच मिळतात. त्यामुळे पुढे ग्राहकांना विक्री करताना दर वाढवून घ्यावा लागतो. आता कोणतीही भाजी ४० रुपयांच्या आत नाही. त्याचबरोबर काही भाज्यांचा दर हा १०० रुपयांच्याही पुढे आहे. ग्राहक आर्थिक उपलब्धततेनुसार खरेदी करतात. - तुषार डोंगरे, विक्रेता