उंडाळे : ‘विरोध संपविण्याची हिटलरचीच पद्धत या देशात सुरू झाली आहे. विचाराची लढाई विचाराने न होता आता विचारांच्या लढाईला गोळीने संपविले जाऊ लागले आहे. देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ अशी भीती ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केली. येथील स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ३२ व्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशनात ते बोलत होते. यंदाचा ‘दादा उंडाळकर सामाजिक’ पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना प्रदान करण्यात आला. रोख ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मापत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे, हसनभाई देसाई, स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय देशपांडे, जयसिंंगराव पाटील, स्मारक समितीचे विश्वस्त प. ता. थोरात, किसन वीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरविंंद चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक दादासाहेब गोडसे, वाघोजीराव पोळ, जयवंतराव केंजळे, वसंतराव मानकुमरे, माजी शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, संदीप श्रोत्री, विठ्ठलराव जाधव, राजनशेठ चिपळूणकर, रफिकशेठ बागवान, उषा खैरे उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, ‘सर्वांच्या किमान गरजा पूर्ण होईपर्यंत आपला स्वातंत्र्यलढा संपलेला नाही. स्वातंत्र्यसैनिक संपत चालला असला तरी त्यांचे विचार उंडाळेचीस अधिवेशनाच्या माध्यमातून जोपासले जात आहेत,’ अशा शब्दांत भाई वैद्य यांनी समाधान व्यक्त केले आणि हा उपक्रम यापुढेही जोपासला जावा, अशी इच्छा व्यक्त केली.डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, ‘जिथं माणसं राहतात हेच जगाला माहीत नव्हते, तिथे जाऊन लोकांसाठी काम करावं, हा बाबा आमटे यांना झालेला साक्षात्कारच म्हणावा लागेल. ज्याठिकाणी २५० किलोमीटरचा प्रवास करून आम्ही चार-पाच दिवसांनी पोहचलो, त्याठिकाणी काम करायचं म्हणजे अनंत अडचणी होत्या. ज्या जंगलात फक्त माणसं आणि जंगली प्राणीच होते. तिथं आम्ही काम सुरू केलं. त्या माणसांचं जग बदलण्यात आम्हाला यश आलं, याचं समाधान आहे.’ यावेळी परिसरातील ग्रामस्थ व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
देशात हिटलरशाही वाढण्याचा धोका : वैद्य
By admin | Published: February 18, 2015 10:43 PM