पेट्री : यवतेश्वर घाटात मागील आठवड्यात महाकाय दगड कोसळून संरक्षक कठडा तुटला होता. दहा-बारा दिवस होऊन गेल्यानंतरही अद्याप सात मीटर लांबीचा तुटलेला संरक्षक कठडा नादुरुस्त अवस्थेत असल्याने अपघाताचा संभव असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येऊ लागला आहे. यामुळे एकीकडे दरड कोसळण्याचा धोका, तर दुसरीकडे संरक्षक कठड्याची दुरवस्था अशी परिस्थिती आहे.कास, बामणोली जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असल्याने परिसरात पर्यटनासाठी साताऱ्याहून यवतेश्वर घाटमार्गे प्रवास करावा लागतो. येथून सतत वर्षभर वाहतूक सुरू असते. खासगी वाहने, अवजड मालाची वाहने, महाविद्यालयीन तरुण, शाळकरी मुले, नोकरदार वर्गाचीही परिसरातून सतत रहदारी असते. शनिवार, रविवार, जोडून सुटीत मोठ्या प्रमाणावर यामार्गे वाहतूक सुरू असते.कास पठारावरील फुलांच्या हंगामात तर देश-विदेशांतून लाखोंच्या संख्येने पर्यटकांची मार्गावरून वर्दळ असते. पावसाळ्यातही घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण जास्त असते. दोन आठवड्यांपूर्वी घाटात छोट्या-मोठ्या स्वरूपात दरडी कोसळल्या. अशावेळी एकीकडे कोसळलेली दरड, तर दुसरीकडे दुरवस्थेत असलेला संरक्षक कठडा अशा बिकट परिस्थितीत पाऊस, दाट धुक्यातून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
दोन आठवड्यांपूर्वी कोसळलेल्या महाकाय दगडामुळे तुटलेल्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती ‘जैसे थे’ आहे. तुटलेला संरक्षक कठडा नव्याने बांधकाम करण्याची; तसेच रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्स, सूचना फलक बसविण्याची मागणी वाहनचालक, पर्यटकांतून जोर धरत आहे. घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट, तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. कित्येक पर्यटक कठड्यांवर उभे राहून फोटो सेशन करीत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकीकडे आड, तर...!घाटातून प्रवास करताना काहीजण स्टंट, तसेच हुल्लडबाजी करताना दिसतात. ट्रीपल सीटचादेखील अपवाद वगळता येत नाही. एका बाजूने रस्त्यालगत कोसळणारी दरड, तर दुसरीकडे तुटलेल्या संरक्षक कठड्यामुळे ‘एकीकडे आड, तर दुसरीकडे विहीर’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आकस्मिक दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असल्याने घाटात वाहने थांबवून फोटो सेशन, सेल्फी काढणे धोकादायक आहे.
दरड कोसळून तुटलेल्या कठड्यांभोवती पट्टी व दगड लावले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेड्स लावून तुटलेला संरक्षक कठडा तत्काळ नव्याने बांधण्यात यावा. कोणतीही विपरीत घटना घडण्याअगोदर संबंधित विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक, पर्यटक, स्थानिकांतून होत आहे. - निकेश मोहिते, वाहनचालक, सातारा