आॅनलाईन लोकमतखंडाळा, दि. २१ :पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात मुसळधार पावसाने दूरवस्था झाली होती . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करुन नालेसफाई पूर्णत्वास नेली आहे. मात्र यापुढील पावसाच्या पाण्याने दरड वाहून पुन्हा रस्त्यावर येण्याची आणखी शक्यता आहे कारण घाटात ठिकठिकाणी पोखरलेले डोंगरकडे अजूनही ढासळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे घाटातील वाहतुकीस धोका कायम असून डोंगरकडे संरक्षित करणे गरजेचे आहे.या वर्षीच्या पावसाने पहिल्यांदाच खंबाटकी घाटाचे उग्र रूप पहायला मिळाले. डोंगर उतारावरून कोसळणाऱ्या पाण्याने महामार्गाच्या घाटरस्त्यावर डोंगर कठडे कोसळून रस्त्यावरच तांडव उभे केले. घाटातील ही परिस्थिती सुधारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी कामाच्या दर्जात कुचराई झाल्याचे स्पष्ट झाले आहे.गतवर्षभरात घाटाच्या सहापदरीकरणाचे काम करण्यात आले. यासाठी एका बाजूने डोंगर पोखरण्यात आला. पोखरलेल्या डोंगरकडयांची बाजू कमकूवत झाली आहे. याशिवाय हे डोंगर पोखरताना नैसर्गिक दृष्ट्या काय हानी होऊ शकते याचा विचार केला नाही. केवळ रस्त्याचे रुंदीकरण एवढाच एकमेव उद्देश समोर ठेवल्याने पहिल्याच पावसात खंबाटकी खचू लागल्याचे समोर आले आहे. सुरुवातीच्या पावसानेच झालेली दूरवस्था दोन दिवसात सुधारून घाट पूर्ववत करण्यासाठी हायवे प्रशासनाला शिकस्त करावी लागली आहे .
नाले कुचकामी
खंबाटकी घाटात पावसाने थैमान घातल्यानंतर इथली व्यवस्था तुटपूंजी ठरली आहे . घाटात डोंगराच्या बाजूने काढलेले नाले हे अरुंद आहेत . काही जागी तर हे नाले ही पावसाने खचल्याने ते कुचकामी ठरले आहेत . घाटातील सुविधा या केवळ दाखवण्याचा फार्स ठरला आहे . यासाठी हायवे प्रशासन आणि ठेकेदारच जबाबदार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.