आॅनलाईन लोकमतसातारा , दि. ३0 : पावसाळा सुरू झाला वाहतुकीचे सर्व नियम फाट्यावर मारून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्या शेजारून जाणारे वाहनचालकांच्या गाडीस बेडुक उड्या असे विचित्र चित्र शाहूपुरी आता पहायला मिळत आहे... कारण शाहूपुरीत आता खड्यांच्या हंगामाला सुरूवात झाली आहे.वाहतुकीचे नियम सर्वांनाच सारखे असं म्हणतात. वाहनचालकाने गाडी रस्त्याच्या कोणत्या दिशेने चालवावी आणि पादचाऱ्यांनी कुठून चालावे याचे संकेत ठरलेले आहेत. याची पायमल्ली करणाऱ्यांना शासन दरबारी दंडही भरावा लागतो. पण पावसाळा सुरू झाला की शाहूपुरी ग्रामस्थांवर नेमकं या पावसातच वाहतुकीचे सर्व नियम बाजुला ठेवून खड्डे चुकवित रस्त्यावरून जाण्याची वेळ आली आहे.शहराचे उपनगर म्हणून शाहूपुरीचा विशेष परिचय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाहूपुरी मध्ये राहणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विस्तार शाहूपुरीच्या दिशेने होत असल्याने शहराचे महत्वपुर्ण अंग म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. मात्र, त्या मानाने नागरी सुविधांचा अभाव रस्त्यांकडे पाहिले असता जाणवतो. शाहूपुरीच्या स्थापनेपासून तेथील रस्त्यांवर विविध माध्यमांतून जोक झाले आहेत. वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील स्थानिकांची रस्त्यांबाबत घोर निराशाच झाली आहे. ‘पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून’ ही गत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ अनुभवत आहेत. शाहूपुरीत राहणाऱ्या अनेकांना नोकरी, बाजारपेठ, शाळा, व्यवसाय, कॉलेज या कारणांसाठी दिवसातून किमान एक-दोनदा शहरात यावे लागते. तसेच शाहूपुरीला जोडून अनेक ग्रामीण भागाला हाच रस्ता जोडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते. या वर्दळीवर नियंत्रण आणून वाहतुकीचे काही नियम लागु होण्याची चिन्हे नाहीतच. पण पावसाळ्यातील या रस्त्यावरील प्रवास धोकादायक ठरु पाहत आहे. रस्त्यावर साठलेल्या खड्यातील पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकाची दमछाक होते. तर वाहनांचे पाणी अंगावर उडू नये यासाठी पादचाऱ्यांची कसरत सुरू असते. शाहूपुरीवासियांना या बेडुक उड्यांपासून वाचविण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अडथळ्यांची शर्यत
शाहूपुरीत प्रवेश करतानाच रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबांला चुकवून त्याची सलामी द्यावी लागते. तिथून पुढे गेली की जकात नाक्यापासून खड्यांना सुरूवात होते. सुमारे दहा फुट लांबीचे आणि चार फुट रूंदीचे रस्त्याच्या मधोमध असलेले हे सांडपाणी युक्त खड्डे पाहुनच अनेकांच्या अंगावर शहारे येतात. या खड्यांची शर्यत पार केल्यानंतर पुढे छोटासा चौक आ वासून उभा असतो. छोट्टुशा चौकात मोठ्या वाहनांची वर्दळ अपघातांना आमंत्रण देते. त्यामुळे अनेक अडथळे पार करून मगच शाहूपुरीत इच्छित स्थळी पोहोचता येते.
खड्यात पाणी अन मोठे दगडही
शाहूपुरीतील अनेक ठिकाणचे गटारे तुंबलेले आहेत. या गटारीचे पाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून रस्त्यांच्या खड्यामध्ये साठते. हे दुर्गंधीयुक्त पाणी आपल्या अंगावर वाहनांमुळे उडू नये यासाठी काही विद्वानांनी शक्कल लढवली आहे. पाण्याने भरलेल्या खड्यात त्यांनी मोठ मोठे दगड ठेवले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार खड्यातील दगड गतीरोधकाचे काम करतील. पण भरपुर पाऊस झाल्यावर खड्यातील हे दगड दिसत नसल्यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे.
शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गावात अनेक विकासाची कामं झाली. पण दर्जेदार रस्त्याची इच्छा अद्यापही पुर्ण झालेली नाही. निवडणुकीत सर्वांच्या जाहीरनाम्यावर असलेला रस्ता निवडणुकीनंतर ‘त्रिशंकु’ म्हणून बाजूला पडतो.- रणजित काळेल,
ग्रामस्थ, शाहूपुरी