रस्त्यांची धूळधाण
सातारा : सातारा शहरातील मुख्य रस्त्यांचे पालिकेने डांबरीकरण केले असले, तरी अंतर्गत रस्त्याची मात्र धूळधाण झाली आहे. पालिकेने ठिकठिकाणचे खड्डे केवळ खडी व डांबर टाकून मुजविले होते. डागडुजीचे काम दर्जेदार न झाल्याने दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेली खडी पुन्हा उखडली असून, परिस्थिती जैसे थे झाली आहे. या खडीमुळे सर्वत्र धुरळा उडत असून, वाहनधारकांसह पादचाऱ्यांना धुळीतूनच प्रवास करावा लागत आहे. राजवाडा ते समर्थ मंदिर चौक, बोगदा परिसर या रस्त्याची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे.
पाण्याचा अपव्यव;
कारवाईची मागणी
सातारा : एकीकडे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून, दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणीपातळीही खालावू लागली आहे. शहरातील बोगदा, समर्थ मंदिर परिसर व माची पेठ परिसरातील नागरिकांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जात आहे. गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर होत असून, याकडे कोणाचेही नियंत्रण नाही. पाणीपुरवठा विभागाने पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
संरक्षक कठड्यांच्या
दुरुस्तीची मागणी
महाबळेश्वर : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. घाटातील संरक्षक कठडे ढासळले असून, कोठेही दिशादर्शक फलक नाहीत. त्यामुळे या घाटरस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. हा धोका लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
पावसामुळे ओढे
कचऱ्याने तुडुंब
सातारा : सातारा शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वळवाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे ओढे, नाले कचऱ्याने तुडुंब भरल्याने पाण्याचा प्रवाह पूर्णत: बंद झाला आहे. सातारा पालिकेकडून ओढे व नाल्यांच्या स्वच्छतेचे काम तातडीने हाती घेण्यात आले. माची पेठ, केसरकर पेठ, बोगदा परिसर येथे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम पुढे राबविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.