सागर नावडकरशेंद्रे /सातारा : माणसांना कोरोना होतोय, पण एखाद्या रस्त्याला कोरोना झाल्याचे आपण कधी ऐकले नसेल. पण सोनगाव-खिंडवाडी रस्त्याची कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळच मिळत नसल्याने संबंधित गावच्या नागरिकांना रस्त्यालाच कोरोना झाला की काय असे वाटत आहे. या आशयाचा फलक लावून त्याला लॉकडाऊन करा, या आशयाचा फलक लावला. तो सर्वांचे लक्ष वेधत आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा तालुक्यातील सोनगाव-खिंडवाडी रस्त्याची गेली एक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खडी पूर्णपणे उखडल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली असून बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभाग व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सोनगाव ग्रामपंचायतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोनगाव-खिंडवाडी हा कोरोनाग्रस्त रस्ता सोनगाव हद्दीत असला तरी या रस्त्याच्या उपचाराची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे की जिल्हा परिषदेची आहे, यावर संशोधन सुरू आहे. रस्त्याच्या गंभीर आजाराची जाणीव मतदार संघातील सर्वच नेत्यांना आहे. परंतु हा कोरोनाग्रस्त रस्ता केवळ सोनगाव हद्दीत असल्यामुळे होणारे बदनामीचे संक्रमण थांबवण्यासाठी हा रस्ता शासनाने लॉकडाऊन ठेवावा ही ग्रामपंचायतीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे असे जाहीर निवेदनाचा फ्लेक्स बोर्ड या मार्गावर लावण्यात आला आहे.या फ्लेक्स बोर्डमुळे संपूर्ण परिसरात याची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावरच राष्ट्रीय महामार्गालगत तीव्र स्वरूपाचा उतार आहे. त्यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात ग्रामपंचायत मार्फत पाठपुरावा करूनही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग की जिल्हा परिषद सातारा यांच्या कार्यक्षेत्रात येतो याबद्दल प्रशासनामध्ये दुमत आहे.रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करुनही दखल घेतली गेली नाही. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी या रस्त्यावर उपरोधिक फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. आता तरी प्रशासन जागे होणार की नाही, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.पर्यावरणाची हानी टाळण्यास मदतसोनगाव-खिंडवाडी रस्त्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सोनगाव ग्रामपंचायतीतर्फे मार्गावर हा उपहासात्मक फ्लेक्स बोर्ड लावला आहे. आता तरी अपघातांची संख्या विचारात घेता प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा ग्रामपंचायत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करणार आहे, असा इशारा सरपंच पांडुरंग नावडकर यांनी दिला आहे.