वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील कुकुडवाड (म्हस्करवाडी) येथील हुतात्मा जवान सुनील सूर्यवंशी यांचे नाव जम्मू-काश्मीरमधील एक रस्ता व कमानीला देण्यात आल्याने कुकुडवाडच्या नागरिकांच्या स्वाभिमानात भर पडली आहे.
कुकुडवाडच्या म्हस्करवाडी येथील शेतकरी कुटुंबातील शहीद जवान सुनील सूर्यवंशी हे चार वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील सियाचीन या बर्फाळ भागात हिमसखलन होऊन हुतात्मा झाले होते. त्यावेळी त्यांच्यासह हुतात्मा झालेल्या जवानांचे मृतदेह मिळवण्यासाठी केंद्र सरकार व संरक्षण खात्याला मृतदेह शोधून काढण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागला होता. त्याचवेळी देशसेवा करीत असताना आपल्या देशाच्या सरहद्दीवरील जवान किती कठीण परिस्थितीत इमानेइतबारे सेवा बजावत असतात याचा प्रत्यय सर्वांनाच आला होता.
जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने माण तालुक्यातील कुकुडवाड येथील हुतात्मा जवान सुनील सूर्यवंशी यांचे नाव तेथील रस्त्याला व स्वागत कमानीला दिले आहे. हा निर्णय महाराष्ट्र राज्यासह सातारा जिल्हा व दुष्काळी माण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.