ढेबेवाडी : रेहबर ए जरिया फाऊंडेशन व येथील पोलीस ठाण्याच्यावतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, ट्रस्टचे अध्यक्ष वसीम अक्रम शेख, नवाज सुतार, पोलीस कर्मचारी अजय माने, नवनाथ कुंभार, नवाज डांगे, जमीर डांगे, सर्फराज मुल्ला आदी यावेळी उपस्थित होते. वाहतुकीचे नियम व अटींबाबत संतोष पवार यांनी मार्गदर्शन केले. अजय माने यांनी आभार मानले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
सणबूर : ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्राचार्य एस. एस. कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मराठी भाषेचे महत्त्व, आवश्यकता, स्पष्टता याबाबत कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘रयत’चे आजीव सेवक सुधीर कुंभार, शिक्षक पी. डी. जाधव, आर. एस. कापसे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष माधुरी कांबळे व सदस्य उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त निबंध, वक्तृत्व, पोस्टर, नाट्य स्पर्धा तसेच पोस्टर प्रदर्शन घेण्यात आले. ए. डी. कुंभार यांनी आभार मानले. विद्यार्थिनी सई मोहिते हिने प्रदर्शनात पोस्टरबाबत माहिती दिली.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी
मलकापूर : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या उपमार्गावर वाहनचालकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कऱ्हाड ते ढेबेवाडीपर्यंत दुभाजकात वाढले गवत
मलकापूर : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कऱ्हाड - ढेबेवाडी रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम झाले. त्यावेळी अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुभाजकाची निर्मिती करण्यात आली. या रस्त्याचे काम केलेल्या कंत्राटदाराने देखभाल, दुरूस्ती करण्याची मुदत काही दिवस होती. ती मुदत संपल्यानंतर रस्त्याच्या देखभालीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. हळूहळू दुभाजकातील झाडे वाळली तर पावसामुळे गवत वाढले. महिला उद्योग ते चचेगाव परिसरात गवत वाढल्याने व रिफ्लेक्टरची मोडतोड झाल्यामुळे दुभाजकाची दुरवस्था झाली आहे.
पाटण ते चोपडीपर्यंतच्या रस्त्याची स्थिती दयनीय
रामापूर : पाटण, त्रिपुडी ते चोपडी रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाटण त्रिपुडी ते चोपडी मार्गावर मोठे खड्डे पडले असून, या खड्डयांमुळे लहान-मोठे अपघातही झाले आहेत. रस्त्याची दुरूस्ती करण्याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रवासी तसेच ग्रामस्थांमधून केली जात आहे.