कऱ्हाड : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कऱ्हाड आगारात सुरक्षितता मोहीम, रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा या कार्यक्रमाचे उद्घाटन टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. राजेश धुळूगडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक आगारप्रमुख बिस्मिला सय्यद यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक प्रा. धनाजीराव देसाई, किशोर जाधव, मुजावर, सुतार, वैभव साळुंखे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महाडिक यांनी केले तर सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.
विरवडेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर मतदार संघातील विरवडे ग्रामपंचायतीची निवडणूक सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. त्याबद्दल नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. दीपक जाधव, प्रफुल्ल वीर, सागर हाके, शैलेश कोल्हटकर, रत्नमाला धोकटे, जयश्री शिंदे, सुमन धोकटे, बेबीताई कुंभार, अर्चना मदने, वैशाली गोतपागर व तमन्ना मुजावर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
विंग परिसरात भटक्या श्वानांची वाढली दहशत
कऱ्हाड : तालुक्यातील विंग व परिसरात मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांची दहशत वाढली आहे. याठिकाणी श्वानांची मोठी संख्या असून, रात्रीच्यावेळी या श्वानांची टोळकी एकत्र फिरत असून, दुचाकीस्वारांवर हल्ला करत आहेत. रात्रीच्यावेळी अचानक गाडीवर हल्ला केल्याने अपघात होत आहेत.
कऱ्हाडात कृष्णा नाक्यावर खड्डे
कऱ्हाड : येथील कृष्णा नाका येथील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. मसूर तसेच विट्याच्या दिशेने जाणारी वाहने कृष्णा नाक्यावरून मार्गस्थ होतात. याठिकाणी सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित आहे. मात्र, रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहने चालवताना चालक मेटाकुटीस येत आहेत. हे खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे.
शामगावच्या घाटात फांद्या विस्तारल्या
शामगाव : शामगाव येथील घाट रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत. तसेच मार्गानजीक झुडपे वाढल्याने त्यांचा येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. मसूर फाटा ते रायगाव फाटा या घाट मार्गानजीक झुडपे वाढल्याने समोरून येणारे वाहन दृष्टीस पडत नाही. परिणामी, अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन झुडपांच्या वाढलेल्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
कऱ्हाडला घरोघरी जनजागृती सुरू
कऱ्हाड : कऱ्हाडला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील महिलांसह स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातील स्वच्छतादूत यांच्याकडून घरोघरी जाऊन महिलांना स्वच्छताविषयी मार्गदर्शन केले जात आहे. घरातील ओला व सुका कचरा कसा साठवावा, त्याचे कशाप्रकारे फायदे आहेत, अशी विविध माहिती महिला कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. घंटागाडी येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर संबंधित ठिकाणी जाऊन जनजागृती केली जात आहे.
ऊसतोडणीला आला वेग
तांबवे : तांबवे विभागात सध्या ऊसतोडणीला चांगलाच वेग आलेला दिसून येत आहे. रात्री उशिरा मोठ्या प्रमाणात थंडी पडत असल्यामुळे या शिवारात सकाळी नऊ वाजल्यानंतर ऊसतोड मजुरांकडून ऊसतोडीला सुरूवात केली जात आहे. दिवसभर ऊसतोड केल्यानंतर सायंकाळी लवकर मजूर घरी परतत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस लवकर तोडावा म्हणून ऊसतोड मजुरांच्यामागे घाई करत आहेत.
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर ‘वॉच’
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास शंभर रूपयांपासून ते हजार रूपयांपर्यंत दंड केला जात आहे. पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, याच्या कारवाईसाठी एक पथकही स्थापन केले आहे. या पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून शहरात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. संबंधितांना पकडून दंडही केला जात आहे.