सातारा : चारभिंती ते शाहूनगर येथील रस्ता लवकरात-लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. चारभिंतीजवळ वळणावरच खड्डे पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत आहेत.
धुळीमुळे अपघात
सातारा : साताऱ्यातील अनेक मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माती वर आली आहे. त्यातूनच वाहने सुसाट धावत असतात. त्यामुळे अनेक भागात धुळीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी वाहने चालविताना डोळ्यात धूळ जात असल्याने वाहने चालविणे अवघड जात आहे.
सातारा-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर पाचवडच्या पुढे असणाऱ्या एका पेट्रोलपंपानजीक महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे तेथे अपघातासारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना खड्डे दिसत नसल्याने वाहने जोरात आदळत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
गर्दीत मास्कचा वापर
सातारा : सातारा शहरात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, त्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून असंख्य सूज्ञ नागरिक मास्कचा वापर करत आहेत. मात्र, अनेक कापड विक्रेते मास्कचा नीट वापर करीत नाहीत किंवा नाकाच्या खाली हनुवटीजवळ मास्क घेत असतात.
घाणीच्या विळख्यात
सातारा : जुना मोटर स्टॅँड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईमुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही विक्रेत्यांना रस्त्यावर बसूनच भाजी विक्री करावी लागत आहे. या ठिकाणी कचरा कुंडीची व्यवस्था नसल्याने विक्रेते विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकत आहेत.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
सातारा : परळी, ता. सातारा या परिसरात अनेक ठिकाणी सामाजिक वनीकरण हद्दीत वृक्षतोड करण्यात आली आहे. डोंगरात गुरे चरण्यासाठी घेऊन जाणाऱ्यांकडून अशाप्रकारच्या कृती केल्या जात आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. सायंकाळी घरी जाताना मोठ्या प्रमाणात गोळा केलेल्या लाकडांचा मोळ्या घेऊन जात आहेत. तसेच वृक्षतोडींच्या घटना वाढल्या आहेत.