ओगलेवाडी : सातारा, सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या सुर्ली घाटातील रस्ता या पावसाळ्यात खूपच खराब झाला आहे. कऱ्हाडहून जाताना सुरुवातीला आणि घाट संपताना रस्ता खूप खराब झाला आहे. पावसाळा अजूनही बाकी असल्याने रस्ता अजून खराब होणार आहे.
कऱ्हाड व कडेगाव तालुक्यांच्या सीमेवर आणि दोन मंत्र्यांच्या मतदारसंघाच्या सीमेवर सुर्ली घाट आहे. या घाटात नेहमीच वर्दळ असते. अनेक लहान-मोठ्या गावांना कऱ्हाड बाजारपेठेशी जोडणारा हा रस्ता आहे.
अवजड वाहनासह लहान-मोठ्या वाहनांची व बसची ये-जा येथून सुरू असते. मात्र, या पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसाने रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत. घाटाच्या सुरुवातीला तर रस्ता इतका खराब झाला आहे की वाहनधारकांकडून रस्ता सोडून बाजूने वाहन चालविण्यासाठी पसंती दिली जाते.
मुळात घाटातील रस्ता हा अरुंद आहे. वेडीवाकडी वळणे आणि अरुंद रस्ता यामुळे मोठी वाहने चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच रस्ता खराब असल्याने खड्डे चुकवताना कसरत करावी लागते आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते आहे. मोठा अपघात होण्या अगोदर हा रस्ता दुरुस्त केला जावा, अशी अपेक्षा प्रवासी करीत आहेत.
चौकट
अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्त झालेला नाही. कऱ्हाड-विटा रस्त्याचे सिमेंटेशनचे काम गतीने सुरू आहे. या रस्त्याचे काम बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे. मात्र, घाटातील काम अद्याप बाकी आहे. मागील अनेक वर्षांपासून फक्त तात्पुरती डागडुजी केली जात आहे. पूर्ण रस्ता डांबरीकरण करणे आवश्यक बनलेले आहे, तरी या घाटरस्त्याचे त्वरित नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.
फोटो १२ओगलेवाडी
सुर्ली घाटातील रस्त्यावर पडलेले खड्डे.