राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील कऱ्हाड ते विटा मार्गाच्या शहरातील रस्त्याचे डांबरीकरण बुधवारी रात्रीपर्यंत झाले. त्या कामाला काही तासच झाले असताना पालिकेच्या ठेकेदाराने तो रस्ता खोदला. ड्रेनेजच्या कामासाठी डांबरीकरणालगतचा रस्ता खोदल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोणतीही परवानगी न घेता खोदलेल्या रस्त्याच्या नुकसानीला पालिकाच जबाबदार राहील, अशी नोटीस महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंता निखिल पानसरे यांनी मुख्याधिकारी यांना बजावली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे कऱ्हाड ते विटा रस्त्यावर येथील कोल्हापूर नाका ते कृष्णनाका या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. पावसामुळे काही काळ काम बंद होते. मात्र, पावसातही तापमान नियंत्रित करून काम करता येत होते. नागरिकांच्या तक्रारी आल्याने काम थांबले होते. बुधवारी सायंकाळपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असताना पालिकेने गुरुवारी सकाळपासून दोन ठिकाणी रस्ता खोदला. त्यामुळे महामार्गाचे डांबरीकरण धोक्यात आले. परिणामी सहाय्यक अभियंता निखिल पानसरे यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना नोटीस बजावली आहे. नोटिसीनंतर पालिकेने ड्रेनेजचे काम थांबविले आहे. मात्र, रस्ता खोदल्याने डांबरीकरणाच्या दर्जावर परिणाम होणार आहे.