उंडाळे : येवती ते पाटीलवाडी या तीन किमी अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रात्रीच्यावेळी प्रवास करीत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने ही झाडेझुडपे तोडावीत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. यापूर्वी काहीवेळा या झाडा-झुडपांमुळे अपघात घडले आहेत; मात्र तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
तळमावलेत बसथांबा परिसरात वाहतूक कोंडी
तळमावले : तळमावले येथील एसटी बसथांबा परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, ती सुरळीत करण्याची मागणी होत आहे. ढेबेवाडी हे विभागातील महत्त्वाचे ठिकाण असून या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. तसेच नाईकबा देवस्थानासह वाल्मीक पठाराकडे जाणारे पर्यटक व भाविकही याच मार्गाने जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे परिसर नेहमीच गजबजलेला असतो. तळमावले ही विभागातील गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. अनेक गावांतील हजारो ग्रामस्थ दररोज याठिकाणी येतात; मात्र बसथांबा परिसरात वाहतूक कोंडी झाल्यास सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो.
कऱ्हाड शहरात घंटागाड्यांवर मधूर गाणी
कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ कऱ्हाड, सुंदर कऱ्हाड’ असा संदेश देत स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गतवर्षी नव्याने अठरा घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. त्या गाड्यांद्वारे सध्या कऱ्हाड शहरातून मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा गोळा केला जातो. या घंटागाड्या प्रभागात आल्याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून घंटागाड्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश देणारी गाणी लावली जात आहेत. सध्या कऱ्हाड शहरात या घंटागाड्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही घंटागाड्यांवर मात्र सायरन लावण्यात आले आहेत. घंटागाड्यांमुळे शहर कचरामुक्त होण्यास मदत झाली असून कचरा संकलनासाठी आणखी काही गाड्या पालिकेकडून खरेदी केल्या जाणार आहेत.
उंब्रजला सेवालाल महाराज जयंती साजरी
उंब्रज : येथे सेवालाल महाराज यांची १८२ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कऱ्हाड उत्तर भाजपचे तालुकाध्यक्ष महेशकुमार जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. नागेश चव्हाण, महेंद्र जाधव-चोरेकर, अर्जुन पवार, सुनील जाधव, पंडित चव्हाण, शिवलेला राठोड, धर्मा चव्हाण आदी उपस्थित होते. शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले.
अपंग संघटनेतर्फे जीवन संजीवनी प्रशिक्षण
कऱ्हाड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण देण्यात आले. संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. शेखर कोगनूळकर यांनी मार्गदर्शन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, हनुमंतराव अवघडे, सूर्यकांत कोळेकर, स्वप्नील साळुंखे, सुनील डोंगरे, सिराज तांबोळी, रवींद्र चव्हाण, नाजूकबी जमादार, गजानन माने, राजेश खराटे, विक्रांत जाधव, बद्रिनाथ धके, प्रबोधन पुरोहित व अमित बुधकर उपस्थित होते.