रामापूर : पाटण तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे मोरगिरी, कोयना विभागासह तालुक्याच्या इतर ठिकाणी भुस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. साकवपूल, रस्ते वाहून गेले. अनेक ठिकाणी भुस्खलनामुळे रस्त्यावर माती, दगड, गोटे येऊन गावेच्या गावे संपर्कहीन झाली होती. या गावांना पुन्हा संपर्कात आणण्यासाठी नाम फाउंडेशनने पुढाकार घेत, तालुक्यात बारा गावांसाठी रस्ते तयार करून ही गावे पुन्हा संपर्कात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. इतर ठिकाणचे रस्ते खुले करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे
पाटण तालुक्यातील मोरगिरी, मिरगावसह कोयना विभागातील कराटे, कामरगाव, नानेल, हुबरळी, वाटोळे, कुसवडे, ढोकावले, भारसाकळे, मराठवाडी, तर मोरणा विभागातील किल्लेमोरगिरी, झाकडे, या गावाचा भुस्खलनामुळे संपर्क तुटला होता. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करणे अवघड झाले होते. याबाबत पाटणच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे आणि पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी नाम फाउंडेशनला मदत म्हणून तीन पोकलेन मशीन, सहा जेसीबी मशीन, दहा ट्रॅक्टरची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत, नाम फाउंडेशन समन्वयक गणेश थोरात, विक्रमसिंह पाटील, सातारा प्रतिनिधी स्वप्निल थोरात यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. स्थानिक ग्रामस्थांचा प्रशासनाचे सहकार्य मिळत आहे.
गेल्या पंधरा दिवसात फाउंडेशनकडून भूस्खलनामुळे रस्त्यावर आलेले मातीचे ढिगारे, दगड गोटे हटून विविध गावांचे रस्ते दळणवळणासाठी पुन्हा सुरू करण्याची कामे सुरू आहेत. पंधरा दिवसांत जवळपास बारा गावांमध्ये हे काम पूर्णत्वास गेले असून, त्यामुळे या गावांपर्यंत मदत पोहोचविता आली आहे, तसेच विविध गावांतील पाचशेपेक्षा अधिक बाधित लोकांना नाम फाउंडेशनकडून जीवनावश्यक वाटप करण्यात आले आहे. सध्या ढेबेवाडी विभागातील मराठवाडी भारसाकळे या गावात चार किलोमीटरचा रस्ता बनविण्यात येत आहे. नाम फाउंडेशन यांच्या परिश्रमामुळे पाटण तालुक्यातील संपर्कही न झालेली अनेक गावे पुन्हा संपर्कात आली असल्याने, नाम फाउंडेशनच्या या कामाचे लोकांमधून कौतुक होत आहे.