पाटण : नो-पार्किंगचे फलक असतानाही शहरात ठिकठिकाणी वाहनधारकांकडून बिनधास्तपणे नियमांचे उल्लंघन करीत आपली वाहने नो-पार्किंगमध्ये पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, नागरिकांना त्रास सहन होत आहे. नियमबाह्य पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
नाल्याची दुरवस्था
कऱ्हाड : येथील कृष्णा नाक्यावर रस्त्याकडेला असणाऱ्या गटारांची दुरवस्था झाली आहे. गटारावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, कचराही साचला आहे. गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. गटारात साचत असणारा कचरा पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
पथदिव्यांची गरज
मलकापूर : मलकापूर भाजी मंडई ते कृष्णा रुग्णालय परिसरात उपमार्गावर महिलांची नेहमीच वर्दळ असते़ या परिसरात पथदिव्यांची कोणतीही सोय नसल्याने अनेकवेळा अनुचित प्रकार घडतात़ यापूर्वी धूम स्टाईल चोरट्यांनी दागिने लंपास केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी पथदिव्यांची सोय करणे गरजेचे आहे़
श्वानांची दहशत
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली हद्दीतील सिंदल ओढा ते बनवडी फाटा यादरम्यान मोकाट श्वानांचा वावर वाढल्यामुळे वाहनधारक, तसेच शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हाड-मसूर रस्त्यावरून मोकाट श्वान फिरत असतात. अचानक वाहनांच्या समोर श्वान आल्याने अपघात घडत आहेत.