सातारा : सातारा शहराजवळील एमआयडीसीत पोलिस असल्याने भासवून वृध्दांचे दागिने लंपास करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शिवाजी राजाराम कणसे (रा. गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार दि. २१ जून रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास एमआयडीसीतील स्वाती आॅइल मिल समोर हा प्रकार घडला.शिवाजी कणसे हे पत्नीबरोबर घराकडे चालत येत असताना एक अनोळखी जवळ आला. त्याने आवाज देऊन तुम्हाला कोणीतरी पुढे आवाज देत आहे असे सांगितले. पुढे गेल्यावर दुचाकीजवळ उभा राहिलेल्या दुसऱ्या अनोळखीने मी पोलिस आहे. तुमच्या सुरक्षेसाठी आमचा बंदोबस्त चालू आहे. त्यामुळे तुमच्या हातातील अंगठ्या व पत्नीच्या गळ्यातील गंठन काढून द्या, मी तुम्हाला परत देतो असे सांगितले. त्याप्रकरणे दोन सोन्याच्या अंगठ्या आणि मिनी गंठण संबंधिताला देण्यात आला. त्यावेळी त्याने कागदाच्या पुडीमध्ये दागिने ठेवले. त्यानंतर हातचलाखी करुन दगड असणारी पुडी वृध्दाच्या खिशात ठेवली. संबंधित गेल्यानंतर पुडी पाहिल्यावर त्यात दगड आढळून आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस दोघा भामट्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस असल्याचे भासवून वृध्दाला लुटले, सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा
By नितीन काळेल | Published: June 22, 2023 1:59 PM