कऱ्हाड : महामार्गासह राज्यमार्गावरून ‘लिफ्ट’ देण्याचे आमिष दाखवत जीपमध्ये प्रवासी घेऊन त्यांना लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोन मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पाच दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या दरोडेखोरांकडून गुन्ह्यात वापरलेली एक जीपही हस्तगत करण्यात आली आहे. ईश्वर दुबळे (रा. परांडा-उस्मानाबाद), तुकाराम ऊर्फ नाना मुंढे (बीड), संतोष काशीद (पाटोदा-बीड) अशी याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या तिघांनाही तपास पथकाने बोरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तेथील एक गुन्हा उघडकीस आला असून, अन्य गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कसून चौकशी सुरू आहे. कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्यावरून तीन प्रवासी जीपमध्ये घेऊन त्यांना खोडशीनजीक लुटण्यात आल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला होता. या गुन्ह्याची नोंद तळबीड पोलिसांत झाली होती. मात्र, कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांचे पथक पाच दिवसांपूर्वी तपासासाठी लातूर जिल्ह्यात गेले. तेथे मिळालेल्या माहितीनुसार या पथकाने काही ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी या गुन्ह्यातील नावे निष्पन्न झाली. काही ठिकाणी या तपास पथकाला अटकाव करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक पोलिसांची मदत घेत पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा पिच्छा पुरविला. अखेर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा व बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून तीन आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी काही गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेली जीपही पोलिसांच्या हाती लागली. संबंधित जीप पोलिसांनी लातूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. तर आरोपींना बोरगावमधील गुन्ह्याच्या तपासासाठी बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. टोळीतील दोन मुख्य सूत्रधार अद्याप पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे पथक लातूरमध्येच तळ ठोकून आहे. टेपचा आवाज वाढवून मारहाण महामार्गासह राज्यमार्गांवर वाहनाची वाट पाहत थांबलेले प्रवासी हेरून पुढील मोठ्या शहराचे नाव घेत प्रवासी जीपमध्ये घ्यायचे. काही अंतरावर गेल्यानंतर जीपमधील म्युझिक सिस्टमचा आवाज वाढवायचा व प्रवाशांना मारहाण करीत त्यांच्याकडील पैसे, दागिने व रोकड काढून घेत त्यांना निर्जनस्थळी रस्त्यावर सोडून द्यायचे, अशी या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत होती. टोळीने आजपर्यंत अनेकांना लुटले आहे. सात जिल्ह्यांत पंचवीसहून अधिक गुन्हे कऱ्हाडच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या या टोळीने गत काही महिन्यांपासून राज्यभर धुमाकूळ घातला होता. उस्मानाबाद, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये ही टोळी कार्यरत होती. या जिल्ह्यांत पंचवीसहून अधिक गुन्हे या टोळीने केले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश!
By admin | Published: February 23, 2016 12:40 AM