सातारा : येथील सदाशिव पेटेतील ज्वेलर्सच्या दुकानावर काही दिवसांपूर्वी दरोडा टाकून सुरक्षा रक्षकाला मारहाण करणाऱ्या तिघांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे.गणेश सुरेश जाधव, बाबुलाल अंकुश पिटेकर (दोघे रा. खेड, जि. पुणे सध्या रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा), अर्जुन दौलत पवार (रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, सदाशिव पेठेतील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानात सोमवार, दि. २४ रोजी पहाटे दोनच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत सुरक्षा रक्षक बाळकृष्ण गोडसे यांना मारहाण करत दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर दुकानातील सुमारे २८ हजार रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता.
या घटनेनंतर सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. सीसीटीव्ही फुटेजमधील एका संशयिताची ओळख पटल्यानंतर दरोडेखोर हे शहरातून बाहेर गेले नसावेत, असे गृहित धरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने दरोडेखोरांच्या अटकेचे आदेश शाहूपुरी पोलिसांना दिले होते. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी सहकाऱ्यांना दरोडेखोरांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. अर्जुन पवारवर पोलीस लक्ष ठेवून होते. तो रात्री घरी आल्याचे समजताच पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याच्या दोन्ही साथीदारांना ताब्यात घेतले.
अवघ्या तीन दिवसात संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे हे करत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हसन तडवी, हिम्मत दबडे, लैलेश फडतरे, अमित माने, ओंकार यादव, मोहन पवार, स्वप्नील कुंभार, पंकज मोहिते, तुषार पांढरपट्टे, मनोहर वाघमळे यांनी ही कारवाई केली.