सातारा : सालपे घाटातील एका वळणावर ट्रकचालकाला अडवून ट्रकचालक व त्याच्या क्लिनरचे हात-पाय दोरीने बांधून मालट्रकमधील लोखंडी कास्टिंगचे साहित्य लंपास करणाऱ्या टोळीला अवघ्या चोवीस तासांत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल १४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हा संपूर्ण कट ट्रकमधील क्लिनरने रचला असल्याचे तपासात पुढे आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, डीवायएसपी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते.
सांगलीवरून पुण्याकडे दि. १३ रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ट्रक निघाला होता. ट्रकला एका वळणावर पाठीमागून वाहनातून आलेल्या अकरा जणांनी अडवून चालकाचे व क्लिनरचे हात-पाय दोरीने बांधले. त्यानंतर संशयितांनी ट्रकमधील लोखंडी कास्टिंग त्यांच्या वाहनातून नेले तसेच ट्रकही घेऊन फरार झाले.
याबाबत ट्रकचालक भाऊसाहेब जिजाबा शिंदे (रा. बाबुळसर, जि. पुणे) यांनी तत्काळ या घटनेची लोणंद पोलीस ठाण्यात माहिती दिली. लोणंद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने या तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तत्काळ या दोन टीमने तपास सुरू केला.
दरम्यान, ट्रकचालकासमवेत असणारा क्लिनर किरण माळी (वय २३, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) याच्याकडे पोलिसांनी चाैकशी केल्यानंतर तो विसंगत माहिती देत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडेच लक्ष केंद्रित केले. त्यावेळी आपण हा कट इतर साथीदारांच्या मदतीने रचला असल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी एक-एक करत अकरा जणांना अटक केली. किरण माळी हा ट्रक कुठपर्यंत पोहोचलाय हे मोबाईलवर आपल्या साथीदारांना सांगत होता.
सतीश विष्णू माळी, सुनील ढाकाप्पा कदम, सौरभ सुधाकर झेंडे, आकाश शैलेंद्र खाडे, गुरुप्रसाद सुदाम नाईक, सुशांत रमेश कांबळे, ज्ञानेश्वर दत्तात्रय पवळ, प्रतीक कुमार नलवडे, किरण राजाराम माळी (सर्व रा. कवलापूर, जि. सांगली), विजय संभाजी चौगुले (रा. संजयनगर,सांगली), सग्राम राजेश माने (रा. बोरगाव, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ही कारवाई एसपी अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, डीवायएसपी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, रमेश गर्जे, सचिन राऊत, फौजदार गणेश माने, उस्मान शेख, हवालदार शरद बेबले, नितीन गोगावले, गणेश कापरे, प्रवीण फडतरे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, रोहित निकम, आदींनी केली.