सातारा : खटाव तालुक्यातील पुसेगाव आणि माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा व चोरी करणाºया दोन टोळ्यांतील आठजणांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केली.
टोळी प्रमुख सतीश देवबा बुधावले (वय १९, टोळी सदस्य), किरण बाळू बुधावले (वय २३), अक्षय लक्ष्मण बुधावले (वय १९), अजय श्रीरंग जाधव (वय २७), बाळू अंकुश बुधावले (वय २०, सर्व रा. बुधावलेवाडी, ता. खटाव) यांची टोळी तयार झाली होती. हे सर्वजण टोळीने चोरीचे गुन्हे करत होते. पुसेगाव पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. पुसेगाव पोलिसांनी या सर्वांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता.
या प्रस्तावाला अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंजुरी देऊन त्यांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले. दुस-या टोळीवर माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, चोरी, जबरी चोरी अशाप्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख किरण महादेव लोखंडे (वय २३), अनिल हणमंत लोखंडे (वय २९), अरविंद जालिंदर खुडे (वय २२, सर्व रा. मल्हारनगर, म्हसवड, ता. माण) हे टोळीने दरोडा टाकत होते.
या तिघांना हद्दपार करण्यासाठी म्हसवड पोलिसांनी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. या तिघांना सातारा जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.