फलटण : ‘संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना सर्वच पातळ्यांवर संघर्षातून निर्माणाची भूमिका घ्यावी लागत आहे. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर्स, पोलीस व प्रशासकीय यंत्रणेबरोबर जनतेचं सहकार्यही महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले.
फलटण येथील कमला निंबकर बालभवन प्रशालेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना 'वसुंधरा वाचवा' अंतर्गत पर्यावरण दक्षताबरोबर पर्यावरणाचे संवर्धन व वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.
काटकर यांनी कोरोना परिस्थितीत फलटणमधील स्थिती हाताळताना प्रशासकीय पातळीवर नवनवीन योजना व त्यासंदर्भातली उपाययोजना यावर प्रकाश टाकून शासन, प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सध्या स्थितीमध्ये फलटण याठिकाणी लसीकरण मोहीम कशा पद्धतीने राबविली जात आहे यावरही त्यांनी भाष्य केले.
यावेळी प्रगत शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. मंजिरी निंबकर म्हणाल्या, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करताना वैद्यकीय सेवासुविधांच्या कमतरतेची जाणीव झाली. फलटण तालुक्यांमध्ये पाच ते सहा लाख लोकसंख्या असल्याने प्रशासन देत असलेल्या वैद्यकीय सेवा सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे या काळात शासनाच्या वतीने मदत झाली. अतिरिक्त कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका व आशा वर्कर्स त्याचबरोबर वैद्यकीय यंत्रणा, साधनसामग्री पुरविण्यात आली.’
मुख्याध्यापक विश्वास जगदाळे यांनी स्वागत केले. सोमनाथ घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. संज्योत उंडे यांनी आभार मानले.