लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहेत. यात जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे दोन खोल्या आणि कार्यालयात साठा ठेवूनही तो ओसंडून वाहत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
विनापरवाना औषध अन् कॉस्मॅटिकची विक्री करणाऱ्यांसह विनापरवाना त्यांचे उत्पादन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग करडी नजर ठेवते. अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या गोष्टींवर आळा बसविण्यासाठी कारवाईचा बडगा उगारावा लागतो. अनेकदा खबऱ्याच्या माध्यमातून तर काहीवेळा अधिकाऱ्यांच्या दौऱ्यात गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास येते.
पुण्याहून साताऱ्यात येताना या विभागाच्या एका अधिकाऱ्यांची गाडी भुइगंज, ता. वाई येथे थांबली. त्याच ठिकाणी त्यांना अवैध पद्धतीने औषधांची खुली विक्री होत असल्याचे त्यांनी पाहिले. त्याचे काही फोटो काढून ठेवल्यानंतर त्यांनी कार्यालयात येऊन परवानगीची खातरजमा केली. प्रत्यक्षात मात्र परवानगी नसल्याचे आढळल्यानंतर कारवाई करून दंडही करण्यात आला. कारवाईचं प्रमाण वाढत असताना त्यांना स्वतंत्र कार्यालय आणि जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यासाठीही जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
वर्षभरात गुटख्याच्या सर्वाधिक कारवाया
राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातली असली तरीही त्याच्या छुप्या उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे. छुप्या पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध असलेला गुटखा पानपट्यांसह किराणा माल दुकान, सलून, टपरी येथेही मिळू लागला आहे. खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने छापा टाकून तो जप्त केला जातो. अन्य कारवायांच्या तुलनेत वर्षभरात गुटख्याची कारवाई सर्वाधिक झाल्याचे पहायला मिळते.
जप्त साठा ठेवण्यासाठी जागाच नाही
अन्न व औषध प्रशासन विभागाचे साताऱ्यातील कार्यालय भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. याच्या तळ मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये जप्त केलेला साठा ठेवला जातो, तर वरच्या मजल्यावर सुमारे सहाशे स्क्वेअर फूट जागेत कार्यालय आहे. तळ मजल्यावरील जागेचा उपयोग गोडाउन म्हणून होतो. पण गेल्या काही दिवसांत येथे मुद्देमाल अधिक प्रमाणात साठला आहे. गोडाउन भरल्यानंतर आता काही वस्तू कार्यालयातही ठेवण्यात आल्या आहेत.
मशीन, मालासह लेबलही
सातारा एमआयडीसी परिसरात विनापरवाना हॅण्डवॉश तयार करणं सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर याची खातरजमा करून या ठिकाणी धाड टाकण्यात आली. या धाडीत तयार हॅण्डवॉश, त्यासाठी वापरण्यात आलेले मशीन, कच्चा माल, भांडी, रिकाम्या बाटल्या, पिशव्या यासह किमती आणि कंपनीचे लेबल असा तब्बल दोन लाख ७४ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. हा माल ठेवण्यासाठी या विभागाला जागा पुरली नाही. मात्र, मटेरियल एव्हिडन्स म्हणून माल ठेवावा लागत असल्याने त्यांना महिनोंमहिने हा माल गोडाउनमध्येच ठेवावा लागतो.
कोट
कारवाई केल्यानंतर ‘मटेरियल एव्हिडन्स’ सादर करण्यासाठी छापा टाकल्यानंतर बऱ्याच बारीक सारीक गोष्टीही जप्त कराव्या लागतात. त्यामुळे दोन खोल्यांचे आमचं गोडाउन पूर्णपणे भरले आहे. काही साठा आम्हाला कार्यालयातही ठेवायची वेळ आली आहे.
- ए.एस. गोडसे, निरीक्षक, औषध प्रशासन