शिरटे : साखर कारखानदारीत संचालकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बहे (ता.वाळवा) येथे सहकार पॅनलकडून इच्छुकांची मांदियाळी आहे. या पॅनलमध्येच तीन-चार गट असून, उमेदवारीसाठी सर्वच गटांकडून रस्सीखेच सुरू आहे.
संस्थापक पॅनलकडून येथून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, तर ‘रयत’मधील नावांची चर्चा सुरू आहे. राजारामबापू साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील यांच्या पत्नी जयश्री ‘कृष्णा’च्या विद्यमान संचालिका आहेत. त्यांनी स्वत: किंवा मुलगा माजी उपसरपंच मनोज पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मदनराव मोहिते यांचे स्नेही व माजी संचालक अजितराव थोरात हेही ‘सहकार’कडून इच्छुक आहेत.
विद्यमान संचालक अमोल गुरव, सोसायटीचे माजी अध्यक्ष विलासराव हंबीरराव पाटील, संगीता सुनील पाटील, माजी सरपंच सर्जेराव दमामे यांच्या पत्नी हेमलता, खरातवाडीचे माजी सरपंच आविनाश खरात व हुबालवाडीचे सीताराम हुबाले या सहा इच्छुकांच्या नावांचा चेंडू राजारामबापू कारखान्याचे विद्यमान संचालक विठ्ठलराव पाटील, शिवाजीराव मुरारजी पाटील, जयदीप पाटील यांनी चेंडू भोसले यांच्या कोर्टात ढकलला आहे.
महिला राखीव असेल, तर प्रा.संगीता पाटील व सर्वसाधारण गटातून प्रा.सुनील पाटील या पती-पत्नीसाठी मागणी केल्याचे माजी सरपंच बी.जी. पाटील यांनी सांगितले. चारही गटांकडून उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी गावात ‘कृष्णे’चे दोन उमेदवार होते. त्यामुळे याही वेळी दोघांना संधी मिळेल, अशी शक्यता आहे.
माजी संचालक संभाजी दमामे, पत्नी मीनाक्षीदेवी व बंधू संतोष दमामे यांनी संस्थापक पॅनलकडून अर्ज दाखल केले आहेत. एच.आर. पाटील रयत पॅनलकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.