सातारा : पोलिस यंत्रणा सक्षमरीत्या काम करताना नागरिकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून अनेक ठिकाणी आऊटपोस्ट पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात येते. परंतु शाहूपुरी पोलिस ठाणेअंतर्गत मोळाचा ओढा येथील शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोलिस चौकीची वास्तू उभी राहिली. त्याचा लोकार्पण सोहळा साजरा झाला. पण, सध्या ही पोलिस चौकी कायमच बंद राहत असल्यामुळे पोलिसांविना असलेल्या चौकीत कारभारच चालत नसल्याचे उघड झाले आहे. मोळाचा ओढा परिसरातील कायदेशीर अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी तरी ही चौकी कायमस्वरूपी सुरू राहावी, अशी मागणी आता शांतताप्रिय नागरिक करू लागले आहेत.याबाबत माहिती अशी की, शहराचं प्रवेशद्वार असलेल्या मोळाचा ओढा या ठिकाणी राजरोसपणे मटका, दारू, जुगार तसेच चोरीचा भंगार व्यवसाय तेजीत असल्याने या ठिकाणी पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती. परंतु अनेक वर्ष त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर गेल्यावर्षी ४ मार्च रोजी या ठिकाणी एका दानशूर व्यक्तीच्या सौजन्याने पोलिस चौकीची उभारणी झाली. वीरमाता कालिंदा मधुकर घोरपडे-महाडिक यांच्या हस्ते व खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला. त्यानंतर चार दिवसांतच पोलिस चौकीच्या दरवाजाला कुलूप लागले. ही चौकीच बंद असल्याने या वास्तूचा उपयोग ना पोलिसांना, ना जनतेला असे चित्र पाहण्यास मिळते. अनेकदा शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत नागरिकांनी तोंडी सूचना केली. पण, त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. मोळाचा ओढा परिसरात राडेबाजी नित्यनेमाची झाली आहे. या ठिकाणची पोलिस चौकी शोपीस न राहता जनतेच्या सेवेसाठी उघडी असावी, अशी रास्त मागणी शांतताप्रिय नागरिक करत आहेत. सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे संघर्ष व प्रचाराची रणध्ुमाळी त्यातून निर्माण होणारे वाद यावर अंकुश ठेवण्यासाठी ही पोलिस चौकी उघडी राहणे पोलिस व जनतेच्या हिताचे आहे. (प्रतिनिधी) ...शाहूपुरीचा भार हलका होईल !शाहूपुरी पोलिस ठाण्याचा विस्तार व कारभार वाढला आहे. या ठिकाणी पोलिस दलाची संख्या कमी असल्याने मोळाचा ओढा पोलिस चौकीत पोलिस कर्मचारी नेमणे अशक्य असल्याचे जाणवत आहे. तरीसुद्धा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी किमान दोन पोलिस कर्मचारी यांची या ठिकाणी नियुक्ती केल्यास शाहूपुरी पोलिस ठाण्याचा काही भार हलका होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ही पोलिस चौकी सुरू व्हावी यासाठी आता नागरिक प्रतीक्षा करू लागले आहेत.
मोळाचा ओढा चौकी पोलिसांविना कुलूपबंद..
By admin | Published: December 21, 2016 11:53 PM