नितीन काळेल - सातारा -पावसाचे बिघडलेले वेळापत्रक आणि पिकांना गरज असते त्यावेळी पावसाने पाठ फिरविल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी शासनाने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रशासकीय तयारी केली आहे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील केंद्रांची निवड केली आहे. पण, माण-खटाव तसेच लगतचे सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील माणदेशातील काही तालुके दुष्काळग्रस्तच म्हणून ओळखले जातात. तेथेही असा प्रयोग व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरवर्षी पावसाचे चक्रमान बदलले आहे. पाऊस कधी वेळेवर येतो तर कधी महिनाभर उशीर लावतो. त्यामुळे पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे जमत नाही. कधीकधी खरीप हंगामही घेता येत नाही. पावसाचे वेळापत्रक शेतकऱ्यांना अघटित ठरू लागले आहे. अशा या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी भारतीय हवामान विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी विभाग, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांची समितीही त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. याचे प्रात्यक्षिकही लवकरच केले जाणार आहे. या कृत्रिम पावसासाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीची मध्यवर्ती केंद्र म्हणून निवड करण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी विमान उडण्याची व उतरण्याची सोय आहे. याशिवाय हे दोन्ही विभाग दुष्काळाने होरपळलेले आहेत, म्हणून ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण, मराठवाडा तसेच विदर्भाप्रमाणे माणदेशातीलही काही तालुके पूर्वीपासूनच दुष्काळी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुका तसेच शेजारील सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहंकाळ. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला तालुक्यात दरवर्षी ४०० मिमीच्या आसपासच पाऊस पडतो. दोन-तीन वर्षांतून दुष्काळ पडतो किंवा पाऊसमान कमी होते. त्यामुळे मराठवाडा विदर्भ याप्रमाणेच माणदेशातील या दुष्काळी तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याला राजकीय इच्छाशक्तीचीही आवश्यकता आहे. तरच माणदेशातही हा प्रयोग राबविला जाऊ शकेल. ढगात मिठाची फवारणी...जगात अनेक ठिकाणी रॉकेट आणि विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. रॉकेटच्या साह्याने २० किमीच्या परिसरात तर विमानाद्वारे २०० ते ३०० किमी भागात पाऊस पडतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडायीडची फवारणी पाऊस असणाऱ्या ढगात केली जाते. त्यामुळे पाण्याचे थेंब गतिमान होतात. म्हणजेच पावसाचे ढग डॉपलर रडारच्या साह्याने शोधण्यात येतात. त्यात मिठाची फवारणी करायची. त्यामुळे ढगात आद्रता वाढते आणि पाऊस पडतो. कऱ्हाड, बारामतीला विमानतळ आहेच की...मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीची मध्यवर्ती केंद्र म्हणून निवड झाली आहे. कारण दोन्ही ठिकाणी विमान उडण्याची आणि उतरण्याची सोय आहे. तसेच सातारा-सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाऊस पाडण्यासाठी कऱ्हाड येथील विमानतळ जवळच आहे. तसेच सोलापूर, बारामती येथेही विमानतळ आहे. तेथून माणदेश फारसा दूर नाही. त्यामुळे ढग आल्यानंतर या विमानतळावरून विमाने उड्डाण करू शकतात. त्यामुळे माणदेशातील दुष्काळी तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. त्याचबरोबर २००३ मध्ये बारामती येथून असाच एक प्रयोग केला होता. त्याचा संदर्भही घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे. मराठवाड्या- प्रमाणेच सातारा-सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक तालुके कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. या तालुक्यात अजूनही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. वारंवार येथे दुष्काळ पडत असतो. त्यामुळे या तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडण्याची आवश्यकता आहे. - प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी कुरणेवाडी माण
पावसाचं विमान इथंही फिरवा
By admin | Published: May 24, 2015 11:05 PM