नितीन काळेल
सातारा : सातारा शहर परिसरातील एका कॅफैमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत ‘रिपाइं’ आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. तसेच तेथे अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याची माहिती मिळताच शहर पोलिस घटनास्थळी धावले. त्यानंतर काही तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा शहराच्याजवळ एका मोठ्या हाॅटेलच्या परिसरात एक कॅफे आहे. याठिकाणी तरुण-तरुणी येतात. तसेच चुकीच्या घटना घडत असल्याचा आरोप करत ‘रिपाइं’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते कॅफेत घुसले. तसेच जाेरदार घोषणाबाजी करत आत दगडही मारण्यात आले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तेथील पदाधिकाऱ्यांशी बातचित केली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते निघून गेले. यावेळी पोलिसांनी काही तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले. तसेच त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान, कॅफेत अल्पवयीन मुले-मुली बसले होते. त्यामुळे पोलिसांना बाेलवून कारवाई केली. तर तेथील शेजारचा गाळा उघडल्यानंतर तेथे आक्षेपार्ह गोष्टी दिसून आल्या. अशाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यापुढे अशा चुकीच्या कॅफेविरोधात आंदोलन करणार आहे, असा इशारा ‘रिपाइं’च्या वतीने देण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यात गर्दी...सातारा शहरात तरुणांना आणण्यात आले होते. त्यामुळे परिसरात गर्दी झाली होती. सायंकाळच्या सुमारास तरुणींना पोलिसांनी सोडले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंद झालेला नव्हता. पण, पोलिस अधिकाऱ्यांनी आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली.