आॅनलाईन लोकमतमायणी (जि. सातारा), दि. ७: येथील खराब रस्त्यामुळे गेली अनेक वर्षे मायणी, मोराळे, निमसोड मार्गावरील एसटी बंद होती. आता या मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी व विद्यार्थी वर्गाकडून होत आहे. मायणीतून निमसोडला मोराळे मार्गे जाणारा रस्ता गेली अनेक वर्षे खराब होता. या मार्गावर पूर्वी दहिवडी-निमसोड, मायणी-मोराळे अशा एसटी बसच्या फेऱ्या होत्या. यातील दहिवडी निमसोड ही एसटी निमसोड येथे मुक्कामी होती. मात्र, सध्या मायणीला एसटीच नसल्याने काही विद्यार्थ्यांनी चक्क शिक्षणालाच रामराम ठोकला आहे. अनेक विद्यार्थी मायणी येथे कनिष्ठ महाविद्यालायत व वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत होते. ही एसटी बंद झाल्यामुळे व सकाळी मायणीस येण्यासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे निमसोड व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वडूज एसटी मुक्कामाला असल्यामुळे नाइलाजास्तव वडूजला जावे लागू लागले. वास्तविक, मायणी ते निमसोड हा नऊ किलोमीटरचा आंतर. तेथून वडूज सुमारे वीस किलोमीटर आहे. मात्र वडूज-निमसोड, वडूज-म्हासुर्णेे या एसटी सुरू असल्यामुळे व मायणीला जाण्यास एकही एसटी नाही, त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वडूजला पाठवत आहेत. वडूज एसटी आगाराला अनेकवेळा विनंती करूनही केवळ खराब रस्त्याचे कारण पुढे करून एसटी सुरू करण्यास टाळाटाळ सुरू असल्याने अनेक वर्षे एसटीअभावी विद्यार्थी व पालक आर्थिक भुर्दंड सहन करीत होते, आता हा नऊ किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. त्यामुळे वडूज आगाराने मायणी-निमसोड या मार्गावर सकाळी सात वाजता, दहा वाजता दुपारी तीन वाजता व सायंकाळी सहा वाजता अशा किमान चार फेऱ्या या मार्गावर सुरू केल्यास या भागातील मोराळे, निमसोड, शिरसावडी, होळीचेगाव आदी भागात व वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांची सोय होईल तसेच मोराळे हे गाव पूर्ण मायणीवर अवलंबून आहे. येथील प्रत्येक गोष्टीला मायणीस आल्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आहे. पाचवीच्या पुढील शिक्षणास मुला-मुलींना मायणीशिवाय दुसरे कोणतेही गाव नाही, अशातच खराब रस्ता एसटी नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी पाचवीपासून पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी रोज दहा किलोमीटर पायपीट करीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी येण्या-जाण्याची सोय नसल्यामुळे सातवी, दहावी झाल्यानंतर शाळा शिकणेही सोडून दिले आहे. कित्येक वेळा पालक, शिक्षक विद्यार्थी व ग्रांमस्थानी एसटी सुरू करण्याची विनंती वडूज आगाराला केली आहे. पण प्रत्येकवेळी खराब रस्ता हे एकमेव कारण पुढे करून एसटी बंद केली आहे. आता मात्र हा नऊ किलोमीटरचा रस्ता पूर्ण चांगला झाला आहे. त्यामुळे वडूज आगाराने या मार्गावर शटल सुरू करावी अशी मागणी होत आहे
दिवसातून किमान दोन फेऱ्या व्हाव्यात..
मायणी, मोराळे, निमसोड, शिरसावडी, भूषणगड, पळशी, औंध, घाटमाता, रहिमतपूर व सातारा हे अंतर फक्त ७० किलोमीटर आहे व हा रस्ता पूर्ण डांबरी आहे. त्यामुळे या मार्गावर एसटी सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. शिवाय जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वडूज-पुसेसावळी आदी मार्गे जावे लागणार आहे. त्यामुळे वडूज किंवा सातारा आगाराने या मार्गावर किमान दिवसातून दोन फेऱ्या सुरू कराव्या.
... तरच विद्यार्थ्यांची पायपीट थांबेल !
मायणी-मोराळे किंवा निमसोड शटल सुरू झाल्यास मोराळे येथील मुला-मुलींना जे रोज शिक्षणासाठी दहा किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. ती थाबेल व मुलींना अर्धवट शिक्षण सोडावे लागणार नाही.