शिरवळ : वाठार कॉलनी (ता. खंडाळा) येथे शेतीसाठी नवीन वीज जोडणी देण्यासाठी वीस हजारांच्या लाचेची मागणी करीत तडजोडीनंतर बारा हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता शरद ओंकेंश्वर ओंकार (वय ४६ ) याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या लोणंद ता. खंडाळा येथे राहत असून मूळचा लोणसावळे पो. वायफड जि. वर्धा येथील आहे. ओंकार याच्या अटकेनंतर लोकांनी समाधान व्यक्त केले असून काही गावांत फटाक्यांची वाजविण्यात आले.याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार शेतकऱ्यांने शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी कागदपञांची पूर्तता करुन वाठार काँलनी शाखेचे कनिष्ठ अभियंता शरद ओंकार यांच्याकडे रितसर अर्ज दाखल केला होता. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने कनिष्ठ अभियंता शरद ओंकार यांच्याकडे नवीन कनेक्शनसाठी पाठपुरावा सुरु ठेवला. मात्र, अभियंता शरद ओंकार यांनी नवीन कनेक्शनसाठी शेतकऱ्याकडे वीस हजार रुपयांची मागणी केली.संबंधित शेतकऱ्याने सातारा येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सातारा लाचलुचपत विभागाचे प्रभारी उपअधिक्षक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस अंमलदार विनोद राजे, संभाजी काटकर, मारुती अडागळे यांच्या पथकाने वाठार कॉलनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये पडताळणी करीत सापळा रचला. वीस हजार रुपये ऐवजी तडजोडअंती बारा हजार रुपये मागणी करीत स्विकारल्या प्रकरणी पोलीसांनी रंगेहाथ अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन राऊत हे करीत आहे.
साहेब...पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाहीकनिष्ठ अभियंता शरद ओंकार याची चौकशी सुरु असताना त्याठिकाणी लाचलुचपतच्या कारवाईपासून अनभिज्ञ असलेला एक युवक वीज कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता शरद ओंकार याला नवीन वीज कनेक्शन मिळणेकामी सहा हजार रुपये देण्यासाठी आल्याचे निदर्शना आले. यामुळे घटनास्थळी असलेले सर्वच अवाक झाले. यावेळी संबंधित युवकाने साहेब..पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी पैसे वाचल्याचा आनंद युवकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.फटाके वाजवून आनंदोत्सव..!वाठार कॉलनी येथील कनिष्ठ अभियंता शरद ओंकार याच्यावर लाचलूचपत विभागाने कारवाई केल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी खंडाळा तालुक्यात पसरली. त्यानंतर वाठार कॉलनी विभागातील काही गावातील त्रस्त शेतकऱ्यांनी फटाके वाजवून कारवाईबद्दल आनंदोत्सव साजरा केला.