क-हाड (सातारा) : महामार्गावर मारहाण करून साडेचार कोटी रुपयांचा दरोडा टाकणा-या टोळीत मुंबईच्या फायनान्स कंपनीचा हात असल्याचे समोर आले आहे. कारखानदारांना अर्थपुरवठा करण्यासाठी आलेल्यांपैकीच दोघांनी हा कट रचला असून, त्यांच्यासह अन्य सहाजणांचा त्यामध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर अन्य चौघेजण पसार आहेत.
गजानन महादेव तदडीकर (वय ४५, रा. रमेशवाडी, मानवपार्क, बदलापूर पश्चिम, कल्याण), विकासकुमार संगमलाल मिश्रा (३०, रा. लल्लुसिंग चाळ, दुर्गानगर, मुंबई), महेश कृष्णा भंडारकर (५३, रा. विजय गॅलेक्सी टॉवर, ठाणे पश्चिम), दिलीप नामदेव म्हात्रे (४९, रा. रॉयल अपार्टमेंट कळवा, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. क-हाडनजीक गोटे गावच्या हद्दीत महामार्गावर कार अडवून साडेचार कोटींचा दरोडा टाकण्यात आल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. कर्नाटकतील ‘ज्ञानयोगी स्वामी शिवकुमार शुगर’ नावाच्या कारखान्याचा करार करण्यासाठी कारखान्याचे पदाधिकारी कºहाडात आले होते. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांची कार अडवून तसेच दोघांचे अपहरण करून रोकड लांबविली होती. या घटनेनंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पुणे आणि मुंबईतही पोलिसांनी नाकाबंदी केली. या नाकाबंदीत दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे पोलिसांनी पाठलाग करून या टोळीला मंगळवारी सायंकाळीच अटक केले.
क-हाड शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा या टोळीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता करारासाठी जी फायनान्स कंपनी अर्थपुरवठा करणार होती, त्याच कंपनीचा या दरोड्यात हात असल्याचे समोर आले. कारखान्यासोबतच्या करारासाठी मुंबईच्या किंग्ज फायनान्स कंपनीचा प्रमुख दिलीप म्हात्रे क-हाडात आला होता. कारखाना पदाधिका-यांशी त्याने चर्चाही केली. तसेच दरोडा पडल्यानंतर घाबरल्याचा बनावही त्याने केला. मात्र, या सर्व प्रकरणात तोच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. सुमारे तीन महिन्यांपासून कारखान्याच्या करारासाठी वाटाघाटी सुरू होत्या. त्या वाटाघाटीदरम्यानच म्हात्रेने दरोड्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मुंबईतील त्याचे साथीदार जमवले. तसेच मंगळवारी करारासाठी क-हाडात येणार असल्याने सोमवारी सायंकाळीही मुंबईत सर्वांनी बसून या कटाची उजळणी केली. दिलीप म्हात्रे बनाव कसा करणार आणि इतर साथीदारांनी काय-काय करायचे, हे आदल्या दिवशीच ठरविण्यात आले होते. ठरल्या कटानुसारच त्यांनी मंगळवारी साडेचार कोटींचा दरोडा टाकला. मात्र, या दरोड्याला अवघ्या चार तासांत पोलिसांनी वाचा फोडली.
बडतर्फ पोलीस कर्मचा-याचा सहभागदरोड्यात अटक करण्यात आलेला गजानन तदडीकर हा बडतर्फ पोलीस शिपाई आहे. तो ठाणे पोलीस ठाण्यात कार्यरत होता. मात्र, त्याच्या कृत्यामुळे यापूर्वीच त्याला बडतर्फ करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. तसेच किंग्ज फायनान्स कंपनीचा प्रमुख असलेला दिलीप म्हात्रे इस्टेट आणि कमिशन एजंट म्हणून मुंबईत वावरतो. इतर आरोपी हे सराईत असून, त्यांनी यापूर्वीही पोलीस असल्याची बतावणी करीत लूटमार केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.