पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाखाण रस्त्यानजीक पांडुरंग पार्कमध्ये असलेल्या समर्थ रो हाऊसमध्ये अवधूत भरतसा कलबुर्गी हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चार दिवसांपूर्वी ते कुटुंबासह परगावी गेले होते. सोमवारी ते घरी परत आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसात दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. घरातून पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. मात्र, चोरीस गेलेला ऐवज साडेचार लाखांचा असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. चोरट्यांनी ९० हजारांची रोकड, ९६ हजारांचे दोन तोळ्यांचे ब्रेसलेट, ५७ हजार ६०० रुपयांची बारा ग्रॅमची सोन्याची नथ, २८ हजार ६०० रुपयांची अर्ध्या तोळ्याची साखळी, १४ हजार ४०० रुपयांची तीन ग्रॅमची अंगठी, ७ हजार रुपयांची चांदीची तीन ब्रेसलेट, ६३ हजाराचा ९०० ग्रॅम वजनाचा चांदीचा तांब्या, ६ हजार ३०० रुपयांचे ९० ग्रॅम वजनाचे चांदीचे तीर्थपात्र व चमचा, २ हजारांची निरांजन आणि १ लाख १५ हजार २०० रुपयांच्या कानातील कुड्या असा ४ लाख ८० हजार १०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे अवधूत कलबुर्गी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या चोरीचा कसून तपास सुरू केला असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. तसेच क्रियाशील गुन्हेगारांची माहितीही संकलित केली जात आहे.
घरफोडीत चोरीस गेलेला ऐवज पाच लाखांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:50 AM