उंब्रज : येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून वीजबिलासंदर्भात तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना उद्धटपणाची वागणूक दिली जात आहे. यामुळे उंब्रजसह परिसरातील नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत असून, या अधिकार्याची तातडीने बदली करावी, अशी मागणी जोर लागली आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
कोरोना काळातील वीज लांमध्ये नागरिकांना कोणतीही सवलत मिळाली नाही. अनेक वीजबिलेही अवाच्या सवा आली आहेत. त्यामुळे ग्राहक संतप्त आहेत. वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहक वीज वितरणच्या कार्यालयात आला असता, संबंधित अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तरे न देता अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्यामुळे या कार्यालयातील कामकाजाविषयी नागरिकांचा रोष वाढला आहे.
विद्युत वितरण कंपनीचे उंब्रज येथील कार्यालय कामातील दिरंगाई, वीज दुरुस्ती टाळाटाळ, ग्राहकांशी उद्धट वर्तणूक, संबंधित ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध ठेवून त्यांना सन्मानाची वागणूक व सर्वसामान्य ग्राहकांस अपमानास्पद वागणूक अशा अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्यातच मार्च २०२० मध्ये सर्वत्र कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले. त्यामुळे बहुतांश लोकांचे व्यवसाय, नोकरी व उद्योगधंदे सहा ते आठ महिने पूर्णपणे बंद होते. या काळात नागरिकांनी विजेचा केलेला वापर व त्याचे आलेले बिल वारेमाप आहे. किमान लॉकडाऊनच्या काळातील बिलांमध्ये सवलत मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र विद्युत कंपनीच्या धोरणाने सर्वांचाच भ्रमनिरास झाला आहे. त्यातच मागील पंधरा दिवसांपूर्वी उंब्रजच्या वीज कार्यालयाने ग्राहकांना वीजबिले न भरल्यास कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे वीजग्राहकांची मोठी पंचायत निर्माण झाली आहे. अनेक ग्राहकांना वारेमाप पद्धतीने वीजबिलांची आकारणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारे अधिकचे कर वीजबिलात लावण्यात आले आहेत. तसेच वीजबिलात झालेली वाढ, विविध आकारणी करण्यात आलेल्या रक्कमा याचा थांगपत्ता ग्राहकांना लागत नसल्याने ग्राहक वीज वितरण कार्यालयात वीजबिले समजून घेण्यासाठी व ती कमी करून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र उंब्रजच्या वीज कार्यालयाचे कार्यकारी उपअभियंता हे भलत्याच तोऱ्यात राहून नागरिकांना उद्धटपणे उत्तरे देत आहेत.
ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी त्यांचा अपमान केला जात आहे. बिल कमी करून मिळणार नाही, काय काम आहे, परत येऊ नका अशा प्रकारची उत्तरे देऊन ग्राहकांना धुडकावून लावले जाते. ग्राहकांची मूळ समस्या ऐकून घेण्याऐवजी अधिकारी त्यांच्याच प्रश्नांची सरबत्ती करत आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या या वागणुकीने उंब्रज परिसरातील नागरिक त्रस्त आहे. वरिष्ठांनी या अधिकाऱ्याची तातडीने बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
चौकट
फुकटचा सल्ला देण्यात पटाईत...
उंब्रज येथे नेमणुकीस असणारे वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता यांची कार्यालयीन कामात दिरंगाई सुरू आहे. गेले सहा वर्षांपासून नवीन मीटर बदलून घेण्यासाठी हेलपाटे मारत आहे. कुंभार साहेब उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, तर पैसे भरून मीटर घ्या असा फुकटचा सल्ला देत आहेत.
काशीनाथ जाधव, कोरीवळे