लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जेव्हा कोरोना महामारीचा कहर सुरू होता तेव्हा सातारा पालिकेने सातारकरांसाठी साधे आयसोलेशन सेंटर सुरू केले नाही. आता कोरोना रुग्ण कमी होत असताना आणि लस सर्वत्र उपलब्ध असताना सत्ताधाऱ्यांनी शहरात ‘मोफत लसीकरण’ अशी बॅनरबाजी सुरू केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांची ‘शो बाजी’ सुरू आहे. हा बैल गेला अन् झोपा केला कारभार कधी सुधारणार, असा सवाल विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोने यांनी म्हटले आहे की, सातारा शहरात कोरोनाचे थैमान सुरू होते. त्यावेळी सत्ताधाऱ्यांनी या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. लस मिळत नसल्याने अनेकांनी स्वखर्चाने लस घेतली. कोरोनामुळे हैराण झालेले सातारकर मोठ्या आशेने सत्ताधाऱ्यांकडे पाहत होते; पण, पालिकेत कमिशन, टक्केवारी आणि टेंडर यातच सत्ताधारी गुरफटले होते. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शहरात लसीकरण शिबिर घेतले जात आहेत. मात्र त्यातही ‘शो बाजी’ करून सत्ताधाऱ्यांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. लसीकरण घेतले जात आहे ही बाब चांगलीच आहे. उशिरा का होईना शहाणपण सुचले याबद्दल सत्ताधाऱ्यांचे आभार मानायला हवेत.
सत्ताधाऱ्यांचा बैल गेला अन् झोपा केला कारभार यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असून आता डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यावर पालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी कोरोना लसीकरणाच्या बॅनरबाजीत धन्यता मानत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सातारकरांना नेहमीच बसला आहे आणि आताही बसत आहे. लसीकरण शिबिर आणि तुमची बॅनरबाजी सुरू राहू द्या पण, डेंग्यूपासून सातारकरांना वाचविण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, असे मोने यांनी पत्रकात नमूद केले आहे.