कऱ्हाड : ‘वाहतुकीचे नियम पाळले तरच अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे़ मात्र आपल्याकडे वाहतूक नियमांबाबत निष्काळजीपणा दाखविला जातो़ त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,’ असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.येथील विठामाता विद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानांतर्गत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, जयंत पाटील, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, अशोक पाटील, रवींद्र खंदारे उपस्थित होते़ आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘रस्ता सुरक्षा अभियानात सातत्य आवश्यक आहे़ केवळ वर्षातील आठवडाभर जाहिरातबाजी व बॅनरबाजी करून काहीही उपयोग होणार नाही़ वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे़ मात्र, रस्त्यांची संख्या वाढविता येत नाही़ कऱ्हाडसारख्या ठिकाणी पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे़ या समस्येसह वाहतुकीचा प्रत्येक नियम, प्रत्येक वाहन चालकाने पाळण्याची आवश्यकता आहे़ केवळ एका वाहन चालकाने नियम पाळल्याने अपघातांची संख्या कमी होत नाही़ त्यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे़ कारवाई करता पोलिसांनी, उपप्रादेशिक परिवहनविभागाने कोणताही भेदभाव करू नये़ कायदा सर्वांना समान आहे़ हे नागरिकांनीही लक्षात ठेवावे.यावेळी रवींंद्र खंदारे, सुभाष पाटील, विद्यार्थी पंकज माने यांचीही भाषणे झाली़ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस यांनी प्रास्ताविक केले़ सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चैैतन्य कणसे यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)
वाहतुकीच्या नियमांचे पालन गरजेच
By admin | Published: January 28, 2015 9:03 PM