प्रगती जाधव-पाटीलसातारा : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणारी लस घेतली स्त्री-पुरुषांमध्ये नपुसंकत्व येते, अर्धांगवायूचा झटका येतो हे व यासह अनेक अफवा पसरविल्या गेल्या. मात्र, यातील कोणत्याही अफवेत तथ्य नसल्याचे समोर आले आहे. उलटपक्षी लसीकरण घेऊनही ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांच्यात विषाणूचा संसर्ग मंदावल्याचे वैज्ञानिकांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. त्यामुळे लसीकरण घेऊन स्वत:ला सुरक्षित करणं हेच शहाणपणाचे असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात.
सातारा जिल्ह्यासह देशभरात १६ जानेवारी रोजी कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १०० लसींची ९ सेशन झाली. नंतर त्यात १६ पर्यंत वाढ करण्यात आली. मात्र हजारो लाभार्थ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले. काही लाभार्थ्यांना वेळेत मेसेज पोहचले नसल्याने ही तफावत असल्याचे प्रशासनाकडून सांगितलेही गेले. पण प्रत्यक्षात शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेल्या अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांनी लस न घेण्याबाबत अक्षरश: साकडे घातल्याची चर्चाही चांगलीच रंगली होती.
समाजमाध्यमांवरून लसीकरणाबाबत पसरलेल्या अफवांमुळे लसीकरणाला चांगलाच फटका बसला. नपुसंकत्व, अर्धांगवायू यासह कायमस्वरूपी गंभीर आजार जडणार असल्याच्या अफवांनी हैदोस मांडला होता. मात्र अशी माहिती प्रसारित करणाऱ्या कोणालाही लस घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या दाव्यातील सत्यता सिद्ध करता आली नाही. या उलट वैज्ञानिकांनी पुराव्यानिशी कोविड लसीकरण घेतलेल्यांना झालेला संसर्ग आणि न घेतलेल्यांच्या फुप्फुसांची स्थिती दर्शविणारे व्हिडिओही प्रसारित केले होते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणाला पर्याय नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करून घेणं सर्वांच्याच हिताचे ठरणारे आहे.
लसीबाबत गैरसमज
- कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी मेलेल्या कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटिनमधील अंश घेऊन तयार करण्यात आल्यात. पण, म्हणून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तुम्हाला होत नाही. उलट या रोगाबद्दल रोगप्रतिकारकशक्ती शरीरात निर्माण होऊन रोगापासून तुमचा बचाव होतो.
- कोविडची लस घेतल्यामुळे कोरोना होणार नाही. पण, एक शक्यता अशी आहे की, लस घेण्यापूर्वीच तो झालेला असेल. पण, त्याची लक्षणं तुमच्यात दिसत नसतील आणि लस घेतल्यानंतर ती दिसायला लागली तरीही फुप्फुसावरील त्याच्या संसर्गाचा वेग मंदावलेला राहतो.
- लसीकरणामुळे मासिक पाळी अनियमित येण्याच्या तक्रारीबाबतही बोलले जाते. मात्र, मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. लसीकरण घेतल्याने पाळीचं चक्र चुकणं, पाळी थांबणं, पाळी कायमची जाणं, कायमस्वरूपी थकवा येणे अशा अफवाही उठल्या होत्या. पण असा त्रास महिलांना झाल्याचे ऐकिवात नाही.
लसीकरणाबाबत अफवांमध्ये तथ्थच नाही
- ज्या हाताला लसीकरण दिले जाते त्या हाताला जडत्व येण्याचा अनुभव अनेकांना आला. यातूनच पुढे हा हात कायमचा निकामी होत असल्याची अफवा पसरली. पण यातही काहीच तथ्य नसल्याचे समोर आले आहे.
- कोविशिल्ड लसीच्या जगभरात झालेल्या चाचण्यांमध्ये अशी कुठलीही घटना आढळलेली नाही. पण, लस घेतल्यानंतर साधारण पणे पहिला दिवस थोडाफार ताप, लस घेतलेल्या जागी सूज किंवा तो भाग दुखणं असा त्रास होऊ शकतो.