शिवथर : सातारा-लोणंद रस्त्यावर आरळे, ता. सातारा येथील कदम पेट्रोल पंपानजीक धावत्या इलेक्ट्रिक बाईकला शॉक सर्किटमुळे आग लागल्याने बाईकने अचानक पेट घेतला. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, जयवंत आनंदराव साबळे (रा. शिवथर ता. सातारा) यांची तुनवाल या कंपनीची इलेक्ट्रिक बाईक असून या बाईकला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. ही बाईक घेऊन त्यांचा मुलगा ओम साबळे हा साताऱ्याला जात होता. दुपारच्या सुमारास आरळे नजीक आल्यानंतर बाईकमधून अचानक धूर येऊ लागल्याचे त्याच्या लक्षात आले. यावेळी बाईक रस्त्याच्या बाजूला घेईपर्यंत बाईकने अचानक पेट घेतला.यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी बाईकला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली होती की बघताक्षणी ही इलेक्ट्रिक बाईक पूर्णपणे जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून सांगण्यात आले.दरम्यान, जिल्ह्यात एकीकडे इलेक्ट्रिक बाईक घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला असतानाच साताऱ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली. त्यामुळे वाहन अस्वस्थता पसरली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.
धावत्या इलेक्ट्रिक बाईकने घेतला पेट, बाईक जळून खाक; सातारा-लोणंद रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 6:36 PM