आॅनलाईन लोकमतकोरेगाव (जि. सातारा), दि. १0 : अनेक वर्षे जुन्याच इमारतीत सुरूअसलेल्या कोरेगावसह तालुक्यातील रहिमतपूर, वाठार स्टेशन पोलिस ठाण्यांसह सातारारोड पोलिस दूरक्षेत्राच्या विशेष दुरुस्तीला शासनाने मंजुरी दिली आहे. केवळ रंगरंगोटीवर समाधान मानावे लागणाऱ्या या इमारती आता आधुनिकतेकडे वाटचाल करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार लवकरच विशेष दुरुस्ती मोहिमेस सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाणे ब्रिटीशकालीन इमारतीत आहेत. कोरेगाव तालुक्यात कोरेगाव पोलिस ठाणे आणि सातारारोड पोलिस दूरक्षेत्राची इमारत ब्रिटीशकालीन असून, वाठार स्टेशन व रहिमतपूर पोलिस ठाण्याच्या इमारती या गेल्या ४० ते ४५ वर्षांपूर्वीच्या आहेत. रहिमतपूर आणि वाठार स्टेशन येथे लोकसहभागातून नव्या इमारतींचे विशेषत सभागृहांचे बांधकाम झाले आहे. तेथून आता कामकाज केले जात आहे. रहिमतपूरसाठी नवीन स्वतंत्र इमारत मंजूर झाली असून, त्याचे बांधकाम अनेक वर्षे रडतखडत सुरू आहे.
कोरेगाव आणि सातारारोडमध्ये खुली जागा उपलब्ध असली तरी कामकाजाच्यादृष्टीने तेथे लोकसहभागातून म्हणावी अशी कामे झालेली नाहीत. काही वर्षांपासून पोलिस दलाने संगणकीकरणाकडे विशेष भर दिल्याने या इमारतीत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे, मात्र या यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांच्या देखभाल व दुरुस्तीचा पुन्हा प्रश्न उभा राहत आहे. रेकॉर्ड रुम, मुद्देमाल कक्ष यासह दैनंदिन कामाकाजासाठीची जादा जागेचा वापर होत असून, कर्मचाऱ्यांना बसण्यास म्हणावी अशी जागा उपलब्ध होत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस दलाच्या इमारतींचे सर्वेक्षण करुन विशेष दुरुस्ती मोहीम हाती घेण्यासाठी अंदाजपत्रके तयार केली होती, त्यास वरिष्ठ पातळीवरुन मंजुरी मिळाली असून, आता त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरेगाव तालुक्यात कोरेगाव, वाठार स्टेशन, रहिमतपूर या पोलिस ठाण्यांसह सातारारोड पोलिस दूरक्षेत्राच्या इमारतीची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे १८ लाख १५ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून कामे
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांमार्फत ही कामे केली जाणार असून, त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने निधी उपलब्ध करुन दिल्याने आणि ऐन पावसाळ्यात आता दुरुस्तीची कामे होणार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांसाठी ४० लाखांची तरतूद
जिल्ह्यातील शिरवळ, लोणंद, औंध, वडूज, म्हसवड, दहिवडी, सातारा शहर, सातारा तालुका, बोरगाव, फलटण शहर, फलटण पोलीस उपअधीक्षक कार्यालय या इमारतींचीही विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी सुमारे ४० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रियेस सुरुवात झाली असून, साधारणत आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.